पुणे – पुरंदरमध्ये प्रस्तावित असलेल्या विमानतळाचा विचार करून हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-सासवड हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोने नुकताच “पीएमआरडीए’ला याबाबतचा अहवाल सादर केला आहे.
“पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान, शिवाजीनगरपासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी “शिवाजीनगर ते हडपसरपर्यंतपर्यंत मेट्रो मार्ग नेण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या.
त्यानुसार शिवाजीनगर-रेसकोर्स-हडपसरमार्गे सासवड रेल्वे स्टेशनदरम्यानचा नवीन मेट्रो मार्गाचा सुधारित प्रारूप अहवाल दिल्ली मेट्रोने नुकताच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) सादर केला आहे, अशी माहिती “पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.