व्यक्‍तिविशेष | मुमताज महल

– शर्मिला जगताप

ताजमहल पाहताना मुमताज महलची आठवण येतेच. ताजमहलाचे अप्रतिम सौंदर्य न्याहळत असताना मनात द्वंद्व सुरू होते. ताजमहल एवढा सुंदर आहे तर मुमताज केवढी सुंदर असेल. कारण मुमताजच्या आठवणीसाठीच शहाजहानने हे अप्रतिम सौंदर्य निर्माण केले आहे. ताजमहलमध्ये बादशाह शहाजहानला मुमताजचं प्रतिबिंब दिसत असावं.

सौंदर्याची मालकीण असलेली मुमताज तेवढीच काळजाने हळवी असावी. त्यामुळे शहाजहानच्या हातून हे जगातील सात आश्‍चर्यापैकी एक असलेले आश्‍चर्य घडले. ताजमहल म्हणजे मुमताजचे वास्तुरूपी शिल्प. मुमताजचे सौंदर्य अनादिकालापर्यंत चिरतरुण राहावे यासाठीच शहाजहानने ताजमहलची निर्मिती केली असावी.

प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहल म्हणजे मुमताजने जगाला दिलेला प्रेमाचा संदेशच म्हणता येईल. मुमताजचे सौंदर्य डोळ्यात साठवत, तिची आठवण काढत, तिला ताजमहल रूपात पाहताना शहाजहान काय बरे विचार करीत असेल? प्रेमात त्याग महत्त्वाचा असतो.

मुमताज जिवंत असती तर ताजमहल सारखी कलाकृती शहाजहानच्या हातून निर्माण झाली नसती. ताजमहलच्या निर्माणासाठी जणू मुमताजने आपल्या देहाचा त्याग केला. या त्यागातूनच ताजमहलची निर्मिती झाल्याचे सारखं मनात येत आहे.

ताजमहल सुंदर की, मुमताज हे द्वंद्व अजूनही थांबायला तयार नाही. एक मन म्हणते, ताजमहल सुंदर. कारण आज आपण जे उघड्या डोळ्यांनी पाहतो तेच सत्य. पण लगेच दुसरे मन म्हणते, मुमताज सुंदर म्हणूनच ताजमहल सुंदर बनला आहे.

त्यामुळे हा मान अगोदर मुमताजकडेच जातो. मात्र मनातील विचारांना थोडं शांत करीत मनाला समजावले की, ताजमहलचे सौंदर्य पाहूनच तर मुमताजच्या सौंदर्याची पावती मिळते.

अनेक राजेमहाराजे जगात होऊन गेले. काही युद्धात जिंकले तर काही युद्धात मेले. पण प्रेमानं जग जिंकता येते, हे मुमताजच्या प्रेमाकडे पाहून म्हणावेसे वाटते.

आज तिच्या प्रेमामुळेच ताजमहल देशांच्या सीमा तोडून, जात-धर्माच्या सीमा तोडून प्रेमाचा संदेश देत उभा आहे. सर्व जगाने प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहलला स्वीकार केले आहे.
रोज सकाळी पिवळ्या सूर्यकिरणांनी प्रकाशित होणाऱ्या यमुनेच्या काठावरील या सौंदर्यास मुमताजच्या हळुवार स्पर्शाचा आभास आहे.

ताजमहलचे सौंदर्य पाहताना आपल्या हृदयात, मुमताजच्या हृदयाचं स्पंदन ऐकायला येते. मुमताज म्हणजे महालातील सर्वात सुंदर अलंकार. त्याच प्रमाणे ताजमहल म्हणजे सर्व महालांतून, सर्व वास्तूंमधील सर्वात सुंदर अलंकार.

ताजमहल म्हणजेच पतीचा पत्नीवर असलेल्या प्रेमाचा एक पुरावा. ताजमहलची भव्यता तिच्यावर असलेल्या प्रेमाशी जुळते. ही छान कहाणी मनाला हळूच स्पर्श करून जाते. आज मुमताजच्या स्मृतिदिनी (17 जून 1631) तिची एक आठवण.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.