कोलकाता – अल्पसंख्यकांची मते फोडून भाजपला लाभ पोहोचवणाऱ्या एमआयएम पक्षाला पश्चिम बंगाल विधानसभेत रोखण्यासाठी कॉंग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने रणनिती निश्चीत केली आहे.
पश्चिम बंगाल मध्ये सन 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांमध्ये धार्मिक आधारावर मतदारांमध्ये फूट पाडण्याची खेळी करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून सुरू आहे.
तशातच असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम पक्षाने पश्चिम बंगाल मध्येही आता स्बळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्यामुळे अल्पसंख्याकांची मते विभागू नयेत यासाठीही कॉंग्रेस व मार्क्सवादी पक्षाने तेथे एकत्रित रणनिती आखली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि मार्क्सवादी पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्यांची मंगळावारी रात्री प्रदीर्घ बैठक झाली. त्यात एमआयएम इफेक्टचा कसा मुकाबला करायचा यावर काही धोरण निश्चीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अल्पसंख्याकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी या दोन्हीं पक्षांनी काही कार्यक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. 18 डिसेंबरला नॅशनल मायनॉरिटी डे साजरा केला जाणार आहे. त्या दिवशी अल्पसंख्याकांशी संवाद वाढवण्याचे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
पश्चिम बंगाल प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे की एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम आहे ही बाब अल्पसंख्याकांनी लक्षात ठेवली पाहिजे. या संघटनेने कितीही भ्रम निर्माण केला तरी मतदारांनी गोंधळून जाता कामा नये असे आवाहनही त्यांनी केले.