शिक्रापूर (पुणे) – शिक्रापूरसह परिसरात बेशिस्त वाहनांसह काळ्या काचांच्या वाहनांवर पोलिसांनी बुधवार (दि. 18) पासून कारवाईचा बडगा उचलला आहे. यात एका दिवसांत एकूण 71 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 21 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यात 26 काळ्या काचा (फ्रेम) असलेल्या वाहनधारकांकडून प्रत्येकी 200 याप्रमाणे 5200 तर इतर बेशिस्त 45 वाहनधारकांकडून 15 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शिक्रापूरसह परिसरात सर्वत्र अनेक दिवसांपासून गडद काळ्या रंगांच्या काचांच्या वाहनांचा वावर वाढला आहे. पेरणे फाटा येथे काळ्या काचांच्या वाहनातून खुनाचा प्रकार घडल्याने पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिरणाऱ्या सर्व काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाईचे आदेश पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिले. त्यानुसार बुधवारी पोलीस हवालदार सहदेव ठुबे, पोलीस शिपाई मिलिंद देवरे, होमगार्ड लक्ष्मण शिवले, निखील सुळके, गणेश शिंगाडे, भानुदास रूपनेर यांनी शिक्रापूर चौकामध्ये कारवाई मोहीम हाती घेतली. यात बेशिस्त वाहनचालकांसह काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई मोहीम सुरू केली असून या वाहनांच्या काळ्या काचांची फिल्मिंग काढून टाकत वाहन चालकावर दंड आकारला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईचा परिसरातील नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.
- कर्कश आवाजांच्या बुलेटचे काय ?
शिक्रापूर येथे पोलिसांनी काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई सुरू केली असताना नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे; मात्र अनेक दिवसांपासून कर्णकर्कश आवाजांच्या बुलेट वाहनांमुळे नागरिक आणि ग्रामस्थ त्रस्त झालेले असताना या कर्कश आवाजांच्या बुलेटचे काय? असा सवाल नागरिकांना पडला आहे.