आंदोलन करण्याचा कॉंग्रेसला कोणताही नैतिक अधिकार नाही
बेंगळूरू -कॉंग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. कंत्राटदाराच्या आत्महत्येवरून कर्नाटकातील मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ईश्वराप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी ही टीका
केली आहे.
भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आंदोलन करण्याचा कॉंग्रेस पक्षाला कोणताही नैतिक अधिकार नाही. कारण कॉंग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे, असे बोम्मई म्हणाले. आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या संदर्भात नवीन प्राथमिक चौकशीच्या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल, असे बोम्मई म्हणाले.
मात्र मुख्यमंत्री आपल्या भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केली. जर भाजपला आणि आपल्या सरकारला वाचवायचे असेल तर ईश्वरप्पा यांना त्वरित अटक व्हायला पाहिजे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी खटला दाखल व्हायला पाहिजे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बोम्मई हे देखील सहभागी असल्याचा आरोपही शिवकुमार यांनी केला.
कर्नाटकातील कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन भाजपचा राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांनी दिले आहे.
ईश्वरप्पा यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यापालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.