ईडी, समाजकल्याणला माहिती देण्यास संस्थांची टाळाटाळ
पुणे – शिष्यवृत्ती वितरणातील अपहाराच्या संशयावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून बजावलेल्या नोटिशीला काही शिक्षण संस्थांकडून टाळाटाळ केली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास 780 संस्थांनी माहिती सादर केली नसल्याचे समोर आले आहे. त्यात नामांकित आणि मोठ्या शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
कुलदीप आंबेकर यांनी माहिती अधिकारात दाखल केलेल्या अर्जाला समाजकल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली. विशेष तपास पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार 2010 ते 2017 दरम्यान पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या वितरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या संदर्भात राज्यभरातील शिक्षण संस्थांना नोटीस बजावून वितरित केलेल्या रकमेचा तपशील, लाभार्थी विद्यार्थी आणि त्यांचा अभ्यासक्रम याची यादी, योजनेची मार्गदर्शक तत्त्वे माहिती सादर करण्याचा आदेश दिला होता.
त्यात पुणे जिल्ह्यातील जवळपास 1,500 हून अधिक संस्थांना 2010 ते 2017 दरम्यान केलेल्या शिष्यवृत्ती वितरणाचा तपशील सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी महाविद्यालयांना मुदत देण्यात आली होती. मात्र, 780 संस्थांनी माहिती दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 800 संस्थांनी माहिती सादर केली आहे. यात गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.