अपघाताची शक्यता वाढली ः महामार्गावरील हायमास्टही बंद
सोरतापवाडी -पुणे- सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते कासुर्डी फाटा हा रस्ता टोलनाका मुदत संपल्यावर बंद झाला आहे. परंतु या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महामार्गावर तुटलेल्या जाळ्यांची रडकथा पाचवीलाच पुजली आहे. त्यामुळे वाहनचालकांना तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. रस्त्याच्यामध्ये असलेल्या दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे अपघात होत आहेत. यात अनेकजणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीने तासन्तास नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील असलेले हायमॅक्स काही ठिकाणी बंद आहेत. रस्त्याच्या कडेला लावलेल्या लोखंडी जाळ्या चोरटे काढून नेत आहेत. लोखंडी जाळ्या निघाल्या नाही तर ते तशाच अवस्थेत चोर सोडून देत आहेत.
महामार्गावरील लोणी काळभोर, सोरतापवाडी येथील पुलावर काटेरी बाभळी उगवल्यामुळे नागरिकांना तेथून जाताना याचा त्रास होत आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्याकडेला गवत उगवले आहे. समस्यांचा त्रास नागरिकांना व चालकांना होत आहे. महामार्गाची देखभालीची जर काळजी घेतली तरच होणाऱ्या अपघाताला आळा बसेल, असे नागरिकांनी बोलून दाखविले.