रेल्वेचं तिकीट वेटिंगवर लोकसभेची उमेदवारी कन्फर्म

नशीब कधी कोणते रूप दाखवेल याचा काही नेम नसतो. आता हेच पहा ना ! 1991 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विश्‍वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान होते. अलाहबादच्या सरोज दुबे या अलाहबाद लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्फे तिकीट मागण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या. या जागेसाठी आधीपासूनच अन्य काही उमेदवार दिल्लीमध्ये डेरेदाखल झालेले होते. दुबेंबरोबर व्ही. पी. सिंगांना भेटायला गेलेले के. के. श्रीवास्तव सांगतात की व्ही.पी. सिंगांना भेटण्याचा नंबर खूप वेळाने आला. बोलणी करता करता सायंकाळचे चार वाजले होते. अलाहबादमधून आलेल्या सर्व इच्छुकांना व्हीपींनी परत जाण्यास सांगितले होते. सर्वांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले होते.

तिकिटाचा निर्णय झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल असेही सांगितले होते. त्यावेळी दिल्लीहून तिनसुकिया रेल्वे अलाहबादला येत होती. श्रीवास्तव आणि दुबे यांनी याच ट्रेनचे तिकीट काढले होते. पण ते वेटिंगवर होते. बरेच प्रयत्न करूनही तिकीट कन्फर्म झालेले नव्हते. परिणामी, ते कसेबसे रेल्वेत घुसून चढले. रेल्वेत टीसीशी बोलणी करूनही त्यांना जागा मिळाली नाही. बराच वेळ उभे राहिल्यानंतर सरोजजींचे पाय दुखायला लागले. अखेर त्यांनी एका बर्थपाशी काढलेल्या चपला बाजूला सरकवल्या आणि तिथेच खाली बसल्या. श्रीवास्तवही त्यांच्या शेजारी बसले. सकाळी-सकाळी ते अलाहबादला उतरले. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी प्लॅटफॉर्मवरील स्टॉलवरून पेपर घेतला. पाहतात तर त्यामध्ये अलाहबादच्या जागेवरून जनता दलाच्या सरोज दुबे यांना उमेदवारी अशी हेडलाईन! ते पाहून दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू वाहू लागले !

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.