आहे “होमग्राऊंड’ तरीही…

क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याच देशातील किंवा राज्यातील -शहरातील मैदानावर जेव्हा एखादा सामना भरतो तेव्हा त्या-त्या भागातील खेळाडू या होमग्राऊंडवर भरीव कामगिरी करून जातो. कारण त्या मैदानाचे सर्व बारकावे त्याला माहीत असतात. राजकारणातही बरेचदा असे चित्र दिसते. पण प्रतिस्पर्धी जेव्हा या सर्वशक्‍तीनिशी टक्‍कर देतो तेव्हा होमपिचवरील लढाईही अवघड होते. आजघडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची कर्मभूमी असणाऱ्या गुजरातमध्ये असेच काहीसे वातावरण आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या होमग्राऊंडवर मोदी-शहा जोडगोळीला परफॉर्मन्स देताना कस लागणार आहे.

– विनिता शाह

लोकसभा निवडणुकीचे मतदान काही दिवसांवर आले आहे. देशातील सर्वच मतदारसंघात प्रचारयंत्रणा कामाला लागल्या आहेत. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी सरळ लढत या निवडणुकीत होत आहे. अर्थात या लोकसभेत सर्वाधिक लक्ष गुजरातकडे लागले आहे. कारण नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातची जनता यंदा कोणाला कौल देते याकडे लक्ष लागले आहे. विधानसभेत कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी करून भाजपच्या विजयी घोडदौडीला लगाम घातला.
2014 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये सर्वच्या सर्व 26 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी मात्र वाटते तेवढी निवडणूक सोपी नाही. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरमधून मैदानात उडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. मात्र कॉंग्रेसही कोणतीच कसर सोडण्यास तयार नाही.

कॉंग्रेस निम्म्या जागा मिळवण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेसचा हा आत्मविश्‍वास 2017 च्या विधानसभा निवडणुकीतून मिळाला आहे. जर विधानसभा निवडणुकीच्या मतदानातील आकडेवारीचा आढावा घेतल्यास भाजपला सध्या तरी आठ जागांवर नुकसान दिसून येत आहे. कॉंग्रेसच्या बाजूने गेल्या विधानसभेप्रमाणे मतदान झाले तर सर्व लोकसभा जागांवर क्‍लिन स्विप करण्याचे भाजपचे स्वप्न हवेत विरून जाईल. अर्थात भाजपने अमरेलीतून खासदार नारन कचाडिया आणि साबरकांठा येथून दीपसिंह राठोड यांच्यावर विश्‍वास व्यक्त करत तिकीट दिले आणि जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

2017 ची विधानसभा निवडणुकीतील भाजपची कामगिरी ही दोन दशकांतील सर्वात खराब ठरली होती. कारण यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपने एकहाती कामगिरी करण्याचा पराक्रम केला होता. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 99 जागा मिळवून सरकार स्थापन केले तर कॉंग्रेसने 77 जागा जिंकून मोठी बाजी मारली होती. गुजरातमधील 8 लोकसभा मतदारसंघातंर्गत असलेल्या विधानसभा क्षेत्रात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसच्या बाजूने अधिक मतदान झाले.

त्यात विशेषत: अमरेली, आणंद, सुरेंद्रनगर, पाटन, जुनागड, आणंद, बनासकांठा आणि साबरकांठा लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या विधानसभा जागांवर भाजप 14 हजार ते सुमारे 1.7 लाख मतांनी पिछाडीवर राहिली. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली लढली जाणारी लोकसभा निवडणूक गुजरातमध्ये वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही.

नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यावरून कॉंग्रेस मोदी सरकारला धारेवर धरत आहे तर दुसरीकडे मोदी सरकार कामगिरीचा पाढा वाचत आहे. गुजरातच्या माणसाला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्याच्या भाजपच्या भावनिक आवाहनाला गुजरातची जनता किती साथ देईल, हे आताच सांगणे कठीण आहे.

कॉंग्रेसचे मुद्दे
सौराष्ट्र आणि अन्य कृषीबहुल मतदारसंघातील शेतकरी आत्महत्या, किमान आधारभूत मूल्य, पिकांना कमी हमीभाव यासारख्या मुद्द्यावर कॉंग्रेस भूमिका मांडत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचा अभाव, केंद्राच्या धोरणामुळे उद्योगाचे झालेले नुकसान आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यावरून कॉंग्रेस सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आहे.

भाजपचे मुद्दे
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पुन्हा संधी देणे, विकास आणि राष्ट्रवाद, पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट कारवाई, उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक, किमान आधारभूत शुल्कात दीडहून दोन टक्‍के करणे, आयुष्यमान भारत आणि केंद्राची जनधन योजना आदी मुद्द्यासह भाजप मैदानात उतरली आहे.

नेत्यांची पळवापळवी
भाजपकडून आमदार आणि नेत्यांची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. आमदारांना मंत्री करण्याचे आणि कॉंग्रेस नेत्यांना पक्षात पद देण्याचे आमिष दाखविले जात आहे. कॉंग्रेसचे नेते कुंवरजी बावलिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. त्याचबरोबर काही नेत्यांनाही भाजपने सामावून घेतले आहे. या कृतीमुळे भाजपला बळकटी मिळत आहे तर कॉंग्रेसची स्थिती दोलायमान होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.