कॉंग्रेसच्या कंट्रोल रुममधून…

बदलत्या काळात निवडणुकीचे तंत्र, प्रचाराची पद्धत आणि रणनीतीचे आयामही बदलत गेले. आजच्या काळात लोकसभेच्या निवडणुका जितक्‍या प्रत्यक्ष मैदानात लढल्या जातात तितक्‍याच त्या वातानुकुलित कार्यालयांमध्ये बसलेल्या आकड्यांचे विश्‍लेषण करणाऱ्या विश्‍लेषकांकडूनही खेळल्या जातात. 125 वर्षांची परंपरा असणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये एका कोपऱ्यामध्ये डाटा ऍनालिसिस सेल असून तो पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू आहे. तमिळनाडूचे प्रवीण चक्रवर्ती हे याचे प्रमुख आहेत.

कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणत्या पोलिंग बूथवर कोणत्या धर्माचे किती लोक आहेत? कोणत्या जातीचे किती मतदार आहेत? प्रत्येक मतदाराचा आर्थिक स्तर काय आहे? ते पारंपरिक निष्ठावंत म्हणजेच पक्‍के मतदार आहेत का? कोणत्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत? त्यातील मतदार किती आहे? यांसारख्या सामान्य प्रश्‍नांची उत्तरे सहजगत्या या सेलमध्ये मिळून जातात. त्याचबरोबर ही टीम गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला किती मते मिळाली होती, कोणत्या जातीची किती मते कोणत्या पक्षाला गेली होती, मुद्दे कोणते होते यांसारखी तपशिलातील माहितीही जमा करून त्याचे विश्‍लेषण केले जाते.

प्रवीण यांच्या संगणकामध्ये हा सगळा डेटा स्टोअर आहे. कोणत्याही राज्यातील एका लोकसभा मतदारसंघावर क्‍लिक केल्यानंतर लगेचच त्या मतदारसंघातील बूथवर किती लोक आहेत, किती कुटुंबे आहेत आदी सर्व माहिती क्षणार्धात समोर येते. डाटा ऍनालिटिक्‍स सेलच्या संगणकावर असणारी सर्व माहिती कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांच्या मोबाइलवर कोणत्याही क्षणी पाहता येते. तसेच या सेलचे अध्यक्ष राहुल यांच्याबरोबरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी सातत्याने संपर्कात असतात.

कॉंग्रेस पक्षाने अलीकडेच न्युनतम आय योजना जाहीर करून एकंदरीतच लोकसभेच्या मैदानाचे फासे पलटले आहेत. याबाबत होणाऱ्या टीकेमध्ये एक मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे योजनेचा लाभ देण्यासाठी पाच कोटी लोक कसे शोधणार? याबाबत प्रवीण चक्रवर्ती यांच्या टीमचे योगदान मोठे राहणार आहे. याखेरीज प्रत्येक राजकीय पक्षाची एक वॉर रुम असते. कॉंग्रेसची वॉर रूम दिल्लीतील रकाबगंज गुरुद्वार रोडवरील एका बंगल्यामध्ये आहे. या वॉर रूमला चक्रवर्ती पीस रुम किंवा कंट्रोल रुम म्हणतात. या कंट्रोल रुममध्ये प्रत्येक बूथवरून सातत्याने फीडबॅक येत असतो.

जनतेमध्ये कोणत्या घोषणेचा कितपत प्रतिसाद आहे, कुठे आणखी काय करण्याची गरज आहे आदी सर्व माहिती इथे जमा होते. त्या फीडबॅकच्या आधारावर चक्रवर्ती यांची टीम आपला डेटाबेस पुन्हा तपासते आणि त्यानुसार कार्यकर्त्यांना रॅली काढण्याचे, सभा घेण्याचे, मोठ्या नेत्याला पाचारण करण्याचे निर्देश दिले जातात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.