भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांचे प्रतिपादन
भोर – समाजातील महिला व मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार हा चिंतेचा विषय झाला असून, हे अन्याय अत्याचार समूळ नष्ट करण्यासाठी समाजात एक चळवळ उभी झाली पाहिजे, असे प्रतिपादन भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी केले.
भोर येथे “मासूम’ संस्थेतर्फे महिलांसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, या वेळी राजू मोरे बोलत होते. यावेळी मासूम संस्थेचे संस्थापक डॉ. रमेश अस्थानी, भोर तालुका पंचायत समितीच्या उपसभापती दमयंती जाधव, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, उन्नती महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमा तनपुरे, जयश्री नलगे, मीना शेंडकर, सुनंदा खेडेकर, महिला पोलीस नाईक, प्रमिला निकम, कुमुदिनी पांढरे, सरपंच परिषदेच्या अध्यक्षा रेखा टापरे, कल्पना आवाळे, मंगल मगर, ज्योती चोंडकर, सोनाली सुतार आदींसह पोलीस पाटील संघटना, दक्षता समिती, उन्नत्ती महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.
मासूम ही संस्था समाज आणि परंपरा बदलण्याचे काम करीत असून गावागावांत हिंसामुक्त वातावरण तयार करण्यासाठी प्रबोधन करत आहे. यासाठी महिला आणि युवतींशी संवाद साधत असून, याची खरी गरज आज असल्याचे प्रतिपादन “मासूम’चे डॉ. रमेश अस्थानी यांनी या वेळी बोलताना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगल कुंजीर यांनी केले, सूत्रसंचालन कविता जगताप यांनी केले,तर मालन झगडे यांनी आभार मानले.