पिंपरी -शाळा सध्या ऑनलाइन सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके, गणवेश व अन्य शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती काही शाळांकडून केली जात आहे. शैक्षणिक शुल्काबरोबरच शालेय साहित्यासाठी असलेली रक्कमही शाळा आकारत आहे. करोना परिस्थितीने हवालदिल झालेल्या पालकांच्या चिंतेत त्यामुळे भरच पडली आहे.
पिंपरी-चिंचवड पालक संघटनेकडे 252 पेक्षा अधिक पालकांच्या शाळांबाबत विविध तक्रारी आल्या आहेत. मुलांसाठी पाठ्यपुस्तके शाळांतूनच घेऊन जावी, अशी सक्ती काही शाळा करत आहेत. या “ब्रॅण्ड’ची पुस्तके अन्यत्र मिळत नाहीत, ही पुस्तके “रिप्लेस’ होत नाही, अशी कारणे त्यासाठी शाळांकडून दिली जात आहेत.
तसेच, पालकांनी पूर्ण शैक्षणिक शुल्क भरल्यास त्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातील, असा फंडाही काही शाळांकडून वापरला जात आहे. ऑनलाइन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसताना गणवेश घालून बसण्यास सांगितले जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे गणवेश नाही, त्यांना गणवेश घेण्याची सक्ती केली जात आहे.