सणबूर -उरुल लघुपाटबंधारे तलावामध्ये ठोमसे गावचा रस्ता, नळपाणीपुरवठा विहीर, अतिरीक्त गटांचे भुसंपादन झालेल्यांच्या रक्कमा अदा करुन सातबऱ्यामध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवा. तसेच एक वर्षाच्या आत प्रलबिंत कामे पूर्ण करण्याच्या सक्त सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
दौलतनगर, ता. पाटण येथे ऊरुल लघुपाटबंधारे तलावाच्या कामासंदर्भात आयोजित बैठकीस तहसिलदार रमेश पाटील, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत थोरात, शाखा अभियंता निलेश टकले, तालुका कृषी अधिकारी पुंडलिक माळवे, संचालक शशिकांत निकम, शिवाजी देसाई, अरुण पवार, शंकर माने यांच्यासह ऊरुल, ठोमसे व बोडकेवाडी गावातील पदाधिकारी, खातेदार, शेतकरी उपस्थित होते.
उरुल तलावात 70.24 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार आहे. या प्रकल्पास 2007 नंतर 15 जुलै 2017 रोजी ऊरुल लघु पाटबंधारे तलावाचे कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु, उरुल, ठोमसे, बोडकेवाडी या तीनही गावातील खातेदारांना भूसंपादनाची रक्कम न दिल्यामुळे काम बंद होते.
आ. देसाईंनी तत्कालीन जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे यांच्यासोबत बैठक घेत तीन गावांसाठी एकूण 4 कोटी 50 लाख 85 हजार 301 रुपये भूसंपादनाची रक्कम देण्याची मागणी केली. त्यास मंत्री शिंदे यांनी तात्काळ मान्यता देवून भूसंपादनाची रक्कम मंजूर करुन वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 12 सप्टेंबर 2018 रोजी भूसंपादन विभागाकडून खातेदारांना रकमेचे वाटप करण्यात आल्यानंतर उर्वरित कामास गती आली आहे.
या बैठकीत उरुल लघुपाटबंधारे तलावामध्ये ठोमसे गावचा रस्ता, नळपाणीपुरवठा विहीर, अतिरीक्त गटांचे भुसंपादन झालेल्यांच्या रक्कमा अदा करुन सातबऱ्यामध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवून एक वर्षाच्या आत प्रलबिंत कामे पूर्ण करण्याच्या सक्त सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ना. देसाई यांनी दिल्या आहेत.