सातारा – कास धरणाची उंची वाढवल्याने धरणातील पाण्याचा साठा पुर्वीपेक्षा पाचपटीने वाढला आहे. वाढीव साठयाचा उपयोग होण्यासाठी, केंद्रशासनामार्फत अमृत योजनेमधून 102.56 कोटी रुपयांचा अतिरिक्त नवीन एम.एस.पाईपलाईनचा प्रकल्प मंजूर करुन घेण्यात आला आहे. या नवीन कामाच्या जलवाहीन्या कास धरण परिसरात दाखल झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरुन या पाईप्स, जुन्या जलवाहीनीशी समांतर अंथरल्या जाणार आहेत. नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामातील ही प्रगती निश्चितच सातारकरांसाठी सुखद आणि आनंददायी आहे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
कास धरण ते सातारा अशी सुमारे 27 किलोमीटर लांबीच्या नवीन अतिरिक्त पाईपलाईनच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या एम.एस.पाईपलाईनचे मोठे ट्रक सातारा- कास परिसरात दाखल झाल्यावर उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या पत्रकात पुढे नमुद केले आहे की, साताऱ्याचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष (कै.) प्रतापसिंह उर्फ दादा महाराज यांनी सन 1975-76 साली, कास ते सातारा अशी बंदिस्त पाईपलाईन टाकण्याचे प्रस्तावित केले होते. आमच्या आणि सातारकरांच्या दुर्देवाने दादामहाराज यांचा अकाली मृत्यू ओढवला. पुढे जवळजवळ 22- 23 वर्षे बंदिस्त पाईपलाईनचे काम झाले नाही.
आम्ही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यावर, या कामाला गती दिली आणि महसूल राज्यमंत्री झाल्यावर, उघडया पाटाने येणाऱ्या पाण्याऐवजी सांबरवाडी फिल्टरेशन प्लॅंटपर्यंत अधिक स्वच्छ पाणीपुरवठा बंदिस्त पाईपलाईने होवू लागला. बंदिस्त पाईप झाल्यामुळे पाणी मुरुन (परक्युलेश) वाया जाण्याचे प्रमाणही अत्यल्प झाले. त्यानंतर सातारकरांची तहान भागवणाऱ्या कास धरणाची नुकतीच उंची वाढवण्यात आली.
यासाठी 95 कोटी रुपये विनियोगात आले आहेत. उंची वाढवल्याने भविष्यातील 35-40 वर्षे सातारकरांना बिनखर्चाचा ग्रॅव्हीटीने मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. उंची वाढवल्याने पूर्वीची 0.1 टिएमसी पाण्याची क्षमता असणारे धरण आज रोजी 0.5 टिएमसी क्षमतेचे झाले आहे. पाणीसाठा सुमारे 5 पटीने वाढला आहे.
कास ते सातारा नवीन अतिरिक्त पाईपलाईनचे काम सातारकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि मैलाचा दगड ठरणारे काम आहे. हे महत्वपूर्ण काम पूर्णत्वाकडे जात असल्याने, पुढील सुमारे 40 वर्षांची सातारकरांची चिंता मिटली आहे असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.
योजनेचे अतिरीक्त फायदे
(1) वाढीव पाणीसाठयाचे सुयोग्य वितरण होणार (2) नवीन जलवाहिनी सरासरी 800 एमएम व्यासाची (3) नवीन पाईपलाईनचा अंदाजपत्रकीय खर्च 102 कोटी 56 लाख (4) सुमारे 23 किलोमिटर लांबीची पाईपलाईन (5) 10 लक्ष लिटर क्षमतेची पॉवरहाऊस येथे पाण्याची साठवण टाकी (6) 16 एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र, एक मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत केंद्र (7) सध्या सहा एमएलडी पाणी तर नवीन पाईपलाईनद्वारे 35 एमएलडी पाणी उपलब्ध होणार (8) शहापूर योजना बंद होऊन त्याला कासचेच पाणी जोडले जाणार (9) कण्हेर उद्भव योजनेला देखील कासचेच पाणी जोडण्यात येणार आहे.