पुणे – हनी ट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास (डीआरडीओ) संस्थेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयाकडे केली आहे.
दरम्यान, व्हाइस लेअर चाचणी म्हणजे नेमके काय, पॉलिग्राफ चाचणी आणि या चाचणीत फरक काय, अशी विचारणा न्यायालयाने केली असता, अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी घेण्याआधी दोन्ही चाचण्यांतील फरक स्पष्ट करण्याची सूचना एटीएसला केली. आता 30 जूनला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. डॉ. कुरुलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची कोठडी संपल्याने सोमवारी न्यायालयात सुनावणी होती.
तपासात डॉ. कुरुलकरांकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएसने केली. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी ही मागणी केली. न्यायालयाने व्हाइस लेअर चाचणी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, अशी विचारणा अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, अधिकाऱ्यांना माहिती देता आली नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी चाचणीबाबत सुनावणी घेण्यापूर्वी उपस्थित प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. दरम्यान, कुरुलकर यांनी चाचणीस विरोध केला आहे.