– अमित डोंगरे
वाहत्या गंगेत हात धुवून घेणे कशाला म्हणतात ते आयपीएल स्पर्धेचे समालोचन करत असलेल्या समालेचकांना मिळत असलेल्या मानधनाचे आकडे पाहिले तर लगेचच लक्षात येते. या स्पर्धेत खेळणारे खेळाडू करोडोंची कमाई करतातच पण समालोचकही आपापले खिसे भरून घेतात.
क्रिकेट सामन्यांचे समालोचन करणारे माजी क्रिकेटपटू सध्या ते खेळत असताना मिळत असलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे आयपीएल स्पर्धेच्या सामन्यांचे समालोचन करुन मिळवतात. हर्षा भोगले, सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोप्रा, इयान बिशप, ऍलन विल्किन्स, पुमालेलो बांग्वा, निक नाइट, डॅनी मॉरिसन, सायमन डुल, मॅथ्यू हेडन व केविन पीटरसन हे इंग्रजीतून समालोचन करत आहेत.
या समालोचकांना आयपीएलच्या संपूर्ण मोसमासाठी अंदाजे 2 ते 4 कोटी रुपये इतकी रक्कम मिळते. हिंदी भाषेत समालोचन करत असलेल्या आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, निखिल चोप्रा, तान्या पुरोहित, किरण मोरे, जतिन सप्रू, सुरेन सुंदरम, रवी शास्त्री व सुरेश रैना यांना एका मोसमासाठी 65 लाख ते 3 कोटी रुपये मिळतात. तर यंदापासून या स्पर्धेच्या सामन्यांचे मराठीतूनही समालोचन सुरू झाले असून त्यासाठी संदीप पाटील, विनोद कांबळी, कुणाल दाते, प्रसन्न संत, चैतन्य संत, स्नेहल प्रधान यांची नियुक्ती केली गेली आहे. त्यांचीही कमाई लाखोंच्या घरात आहे.
डगआऊटमध्ये खेळाडूंशी बोलून समालोचकांना माहिती व मुलाखती पुरवत असलेल्या पथकातील अनंत त्यागी, नेरोली मीडोज, स्कॉट स्टायरिस व ग्रॅम स्वान यांनाही लक्ष्मीची कृपा होते. त्यांची कमाई 4 ते 6 कोटी इतकी रग्गड कमाई होते. यंदाच्या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या स्टार समुहाकडून मिळत असलेल्या प्रचंड मानधनामुळे या समालोचकांना कोटीच्या कोटी उड्डाणे घेता येतात.
अर्थात यंदाच्या सामन्यांचे समालोचन ऐकले तर असे वाटते की गावसकर, शिवरामकृष्णन, मॉरिसन, बिशप व ऍलन विल्किन्स यांचा अपवाद वगळता अन्य कोणी नवोदित खेळाडूंबाबत अभ्यासही केलेला नाही. मात्र, एक निश्चित की जसे क्रिकेटची कक्षा रुंदावली तशी आजी-माजी खेळाडूंच्या संधीतही वाढ झाली. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेकांना भवीष्यात क्रिकेटशी निगडित विविध गोष्टींत कार्यरत राहिल्यावर आर्थिक स्थैर्यही मिळू शकते हा विश्वास मिळाला.
पूर्वी जगभरात क्रिकेटमध्ये पैसा येत नव्हता व खेळाडूंना स्थैर्य मिळत नव्हते आता क्रिकेटसारखा पैसा अन्य क्षेत्रात कमीत कमी मेहनतीत अन्यत्र कुठेही मिळत नाही हेच समालोचकांच्या मानधनातून दिसून येते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.