सातारा – जिल्ह्यात व जावळी तालुक्यातही बाधितांची संख्या वाढत असून रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि रुग्ण बरे व्हावेत यासाठी प्रशासनासह सर्वचजण प्रयत्न करत आहेत. मेढा ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून माझ्या कुटुंबाच्यावतीने रुग्णसेवेसाठी डिजीटल एक्सरे मशीन या रुग्णालयास भेट दिले आहे.
रुग्णांसाठी आवश्यक असणारी इंजेक्शन्स प्रशासनाने या रुग्णालयास उपलब्ध करुन द्यावीत. इंजेक्शन आणि औषधाविना रुग्ण दगावू नये, याची काळजी रुग्णालय प्रशासनाने घ्यावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
मेढा ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोविड केअर सेंटर प्रशासना कडून सुरु करण्यात आले आहे. या सेंटरच्या शुभारंभप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या सेंटरसाठी प्रशासनाला डिजीटल एक्सरे मशीन घेण्यासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. ही बाब समजल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी कुटुंबाच्यावतीने डिजीटल एक्सरे मशीन या रुग्णालयास भेट दिले.
यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार शरद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, नगराध्यक्ष अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष दत्ता पवार, माजी बांधकाम सभापती विकास देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत यादव, डॉ. सुतार, डॉ. पारेकर, डॉ. यादव, फार्मासिस्ट गायकवाड आदी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “जिल्हा प्रशासनावर फार मोठा ताण आहे. त्यांनाही कुटुंब, मुलंबाळं आहेत याचे भान ठेवून सर्वांनीच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य केले पाहिजे. जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालये यांची बेड क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे साताऱ्यात पुष्कर मंगल कार्यालयात माझ्या कुटुंबाच्यावतीने 82 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले.
मेढा रुग्णालय सेंटरसाठी माझ्या कुटुंबाच्यावतीने रुग्णसेवेसाठी एक्स रे मशीन भेट दिली.’ सेंटर सुरू झाले पण इथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उणीव भासू देवू नका, या सेंटरसाठी इंजेक्शन आणि आवश्यक औषधे उपलब्ध करुन द्या, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. चव्हाण म्हणाले, “करोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन महात्वाचा आहे. व्हेंटिलेटर चिंताजनक रुग्णांसाठी लागतो. ऑक्सिजनयुक्त बेडची कमतरता भासत होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: पुढाकार घेवून 82 बेडचे सेंटर सुरु करुन दिले. जिल्ह्यातील हे पहिले सेंटर असून अशा पध्दतीने सेंटर्स सुरु झाली तर रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे.’
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याठिकाणी एक्स रे मशीन दिल्याने करोना आणि न्यूमोनियाचे निदान करणे सोपे झाले आहे, असे प्रांताधिकारी मुल्ला यांनी सांगितले. पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.