Home ministry bomb threat – देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाच्या ईमेलने खळबळ उडाली आहे. यावेळी नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेले गृह मंत्रालयाचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मंत्रालयात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही. ही धमकी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मेलद्वारे देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्याने तत्काळ धमकीचा ईमेल दिल्ली पोलिसांना कळवला. माहिती मिळताच पोलिसांची अनेक पथके तात्काळ दाखल झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि बॉम्बशोधक पथकेही तैनात करण्यात आली होती. अलीकडच्या काळात दिल्लीतील अनेक शाळा आणि रुग्णालयांमध्ये बॉम्बची अशीच माहिती ईमेलद्वारे देण्यात आली होती, मात्र प्रत्येक वेळी हा दावा खोटा ठरला आहे.
गृह मंत्रालयाचे कार्यालय नॉर्थ ब्लॉकमध्ये आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये केंद्र सरकारची अनेक महत्त्वाची कार्यालये आणि मंत्रालये आहेत. हे राष्ट्रपती भवन आणि संसद भवनाजवळ आहे. अशा संवेदनशील भागात बॉम्बची धमकी पोलिसांनी गांभीर्याने घेतली आणि तातडीने शोधमोहीम सुरू केली. वृत्त लिहेपर्यंत झडतीमध्ये काहीही संशयास्पद आढळून आले नाही. खबरदारी म्हणून कार्यालये रिकामी करण्यात आली. तपासाअंती पोलिसांनी हा मेल बनावट असल्याचे घोषित केले.
हा धमकीचा मेल कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठवला याचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. ज्या लोकांनी नुकतीच शाळा आणि रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती, त्यांचाही या ईमेलमागे हात आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.