सातारा – दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने झालेल्या “दर्द भरे नगमे” या गीत मैफिलीला सातारकर रसिकांनी भरभरून दाद दिली. महेश बुटे, रियाज ग्रुपकडून सादर झालेल्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, दै. प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, मसाप पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, बंधुत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल वीर, दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालिका शिल्पा चिटणीस, रियाज ग्रुपचे प्रमुख महेश बुटे आदी प्रमुख उपस्थित होते. या मैफिलीमध्ये उदय कुंडलकर, आरती वाणी, अनंत जोशी, दीपाली घाडगे-लोखंडे, डॉ. लियाकत शेख, महेश बुटे इत्यादी गायक कलाकारांनी रसिक श्रोत्यांसाठी गीते सादर केली. दैनंदिन जीवनात गाणी गायल्याने, ऐकल्याने, व गुणगुणल्याने आयुष्य तसेच आनंद वाढतो, असे मत प्रकाश गवळी यांनी व्यक्त केले. सध्याचे आयुष्य धकाधकीचे आहे. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी संगीत किंवा गाणी माणसाला दिलासा देण्याचे काम करत आहेत, असे मत श्री. कात्रे यांनी व्यक्त केले. येणाऱ्या कालावधीमध्ये संगीताचे ग्रुप तयार करणार असून मोठे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे शिरीष चिटणीस यांनी सांगितले. शिरीष चिटणीस संगीतप्रेमी असून त्यांनी अनेक गायक कलाकारांना गाण्याच्या संधी दिली आहे, असे महेश बुटे यांनी सांगितले. कार्यक्रमाला सुभाष कुंभार यांची ध्वनी व्यवस्था लाभली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. निवेदन संगीता हेंद्रे यांनी केले. आग्नेेश शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजय साबळे, डॉ. सुहास पाटील, सुजाता दरेकर, श्वेता जाधव, योगेश चिकणे, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.