वाई – वाई तालुक्यात सोमवारी (दि. 20) रात्री वादळी वार्यासह झालेल्या वळिवाच्या पावसात पांडेवाडी येथे एका घराची भिंत कोसळून नामदेव गणपती शिंदे (वय 70) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची सून आणि नातू जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थवरून मिळालेली माहिती अशी, वाई तालुक्याला काल (दि. 20) रात्री वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. पांडेवाडी येथे सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यात संतोष विनायक शिंदे यांच्या घराची भिंत कोसळून, नामदेव शिंदे (वय 70) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची सून व नातू जखमी झाले आहेत. जखमींना वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
या पावसात तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा असलेली मोठी झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अनेक गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.