सातारा | महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सातारा शाखेमार्फत सातार्यातील तारांगण येथे 154 वे जट निर्मूलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून डोक्यावर जटेचे ओझे घेऊन जगणार्या नागठाणे येथील जयाताईंच्या जटा अंनिसच्या कार्यालयात मंगळवारी काढण्यात आल्या. जयाताईंना डोक्यावरील जटांच्या ओझ्याबरोबर सामजिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर विचार करून त्यांनी जट काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांच्या शेजारी राहणार्या आणि सामाजिक कार्यकर्ते भगवान अवघडे यांच्या ओळखीतील श्रीमती वायदंडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घेण्याविषयी सुचवले. अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे समुपदेशक उदय चव्हाण यांनी जयाताईंच्या डोक्यावरील दोन फूट लांब आणि दोन किलो वजनाची जट काढली. यावेळी डॉ. दीपक माने, भगवान रणदिवे, जयप्रकाश जाधव, विजय पवार, नाथाजी गायकवाड, प्रकाश खटावकर उपस्थित होते. अशा अंधश्रद्धांबद्दल जागरूक होऊन, लोकांनी समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.