पुढच्या वर्षी लवकर या …!

पिंपरी – फुलांची उधळण, ढोल ताशांचा दणदणाट, फुलांनी सजविलेले आणि आकर्षक विद्युत रोषणाई असलेल्या रथात विराजमान झालेले गणराय अशा भक्‍तिमय वातावरणात गणेशभक्‍तांनी गणरायाला निरोप दिला. शहरातील एकूण 26 घाटांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पिंपरीत 12 तास तर चिंचवडमध्ये 10 तास विसर्जन मिरवणूक चालली.

यावर्षी विसर्जन मिरवणूक खूपच लवकर आटोपली. तसेच काही मंडळांनी मुख्य मिरवणुकीच्या रांगेत सहभागी न होता थेट जवळच्या हौदात किंवा घाटावर विसर्जन केले. चिंचवड येथे 40 मंडळांनी तर पिंपरी येथे 60 मंडळांनी गणरायांचे विसर्जन केले. दोन्ही मुख्य मिरवणुकांची रात्री बारा वाजता सांगता झाली. पिंपरी आणि चिंचवड तसेच शहरातील इतर विसर्जन मिरवणुकांच्या ठिकाणी महापालिका आणि पोलिसांच्या वतीने स्वागत व सूचना कक्ष उभारण्यात आले होते.

चिंचवड येथे महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील, नगरसेविका अपर्णा डोके, अश्‍विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, मोरेश्‍वर शेडगे, सहाय्यक आयुक्‍त अण्णा बोदडे, संदीप खोत यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. पिंपरीतील मिरवणूक दुपारी बारा वाजता तर चिंचवड येथील मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरु झाली. मिरवणूक सुरू झाल्यानंतरही दोन मंडळांमध्ये मोठे अंतर दिसत होते. रात्री आठनंतर मिरवणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि अवघ्या तीन तासातच गणेशोत्सव मंडळांनी शहर दणाणून सोडले. पिंपरी आणि इतर भागांमध्ये मंडळांनी साउंड सिस्टीम आणि संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या विद्युत रोषणाईला विशेष भर दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×