Ganeshotsav 2023 : पुण्यातील गणपती विसर्जनाला आता हळूहळू रंगत चढत आहे. दरम्यान, पुण्यातील बेलबाग चौकामध्ये (Belbaug Chowk) गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकाचाही ताल सुरु होता आणि त्याच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत होती. मात्र तेवढ्यात बेलबाग चौकात अॅम्ब्युलन्स आली आणि अॅम्ब्युलन्सला वाट करुन देण्याचे आवाहन पोलिस करत होते.
अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येताच हजारो पुणेकरांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन करून दिले. अॅम्ब्युलन्सरस्ता करुन दिला. अॅम्ब्युलन्सला वाट करून देण्यासाठी पथकाने वादन थांबवले. कार्यकर्ते, स्वयंसेवक, पोलिसांच्या मदतीने हजारोंची गर्दी दोन भागात विभागली. काही वेळात मधल्या रस्त्यातून अॅम्ब्युलन्स कोणत्याही अडथळ्याविना निघून गेली. यानंतर पुन्हा मिरवणुकीला त्याच जल्लोषात सुरुवात होते.
एका इमारतीच्या छतावरुन हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीचे शूटिंग करत असताना ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली. गडबड गोंधळ, ढकलाढकली, चेंगराचेंगरी न होता ही अॅम्ब्युलन्स रुग्णालयाकडे निघून गेली आहे. या व्हिडीओची पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा आहे.
पुण्यात गणेशोत्सव जोरात साजरा केला जातो. हाच उत्सव नीट पार पाडण्याची जबाबदारी पुणे पोलिसांची असते. 10 दिवस उत्तम कामगिरी पार पाडल्यानंतर पुण्यातील गणपतीच्या मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यात 29 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील काही रस्ते बंद करण्यात आले.