राष्ट्रवादी अजूनही उमेदवाराच्या शोधात

– विशाल धुमाळ

दौंड तालुक्‍यात विद्यमान आमदार राहुल कुल यांनी चौदाशे कोटींची विकासकामे केली असल्याचे ते सांगत असून, त्यांनी केलेल्या विकासकामांचे बॅनर प्रत्येक गावात लावले गेलेले आहेत, तसेच मागील काही दिवसांपासून त्यांनी प्रत्येक गावात विविध विकासकामांच्या भूमिपूजन उद्‌घाटनांचा धूमधडाका लावला होता, त्यामुळे एक प्रकारे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जणूकाही सुरुवातच केली आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. आमदार राहुल कुल हे मी महायुतीचा उमेदवार असल्याचे आपल्या भाषणात सांगत आहेत, त्यामुळे त्यांची विधानसभेची तयारी सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दौंड तालुक्‍यात महाजनादेश यात्रा घेऊन येत असल्याने जणू काही त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार, अशी परिस्थिती कुल गटाबाबत झाली आहे.

आमदार राहुल कुल यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीत पवार हे राहुल कुल यांना सहजासहजी निवडणूक सोपी सोडणार नाहीत, अशी चर्चा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने त्यांचा उमेदवार अजून ठरलेला नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनांचे आणि भूमिपूजनांचे कार्यक्रम राष्ट्रवादी कॉंग्रेसने हाती घेतले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष देईल त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करण्याचे सर्व इच्छुकांचे ठरले आहे; पण तरीही सध्या उमेदवार न ठरल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रचार सुरू केल्याचे दिसत नाही. मात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या पद्धतीने जनसंपर्काचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी माजी आमदार रमेश थोरात यांना विकासकामाबाबत समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले होते. त्यानंतर या विषयावर कुल आणि थोरात हे दोघेही बोलले नसल्याने “समोरासमोर चर्चे’चा विषय तसाच रेंगाळत राहिला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कुल आणि थोरात विकासकामांबाबत समोरासमोर चर्चेला बसतील का, असाच प्रश्‍न तालुक्‍यात विचारला जात आहे. कुलांनी आपला प्रचार सुरू केला, मात्र राष्ट्रवादी अजूनही उमेदवारीच्या शोधात असल्याचे चित्र आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.