जयसिंह मोहिते पाटील : शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याची सभा खेळीमेळीत
अकलूज – शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 10 ऑक्टोबरला दीपावलीसाठी ऊस बिलाची रक्कम जमा केली जाईल. कामगारांनाही योग्य बोनस देण्यात येईल, अशी माहिती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
शंकरनगर- अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासद रामचंद्र पताळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, शिवामृतचे चेअरमन धैर्यशिल मोहिते – पाटील, अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील, आजी – माजी संचालक मंडळ, सभासद, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी अहवालवाचन केले. सर्व विषयांना एकमताने सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली. मोहिते पाटील म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी घालून दिलेल्या तत्वावर कारखाना स्थापनेपासून कार्यरत आहे. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच आत्तापर्यंत विविध विकासाच्या योजना राबवल्या आहेत. सध्या साखर कारखानदारीपुढे मोठी आव्हाने आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या धोरणानुसार इथेनॉल वाढीसाठी नवीन डिस्टलरी प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.
या प्रकल्पासाठी 68 कोटी 12 लाख रुपये कर्ज मंजूर झाले आहे. ब्राझील देशाप्रमाणे जेव्हा साखरेचे दर कोसळतात. तेव्हा इथेनॉल निर्मिती करता येते. साखर उत्पादनाला दुय्यम स्थान दिले जाते. तिच परिस्थिती आज आपल्याकडे निर्माण झाली आहे. कारखाने सुरू व्हायला अजून दोन महिने वेळ असला तरी देशात 148 लाख मेट्रिक टन साखर अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करणे गरजेचे आहे. यासाठी अभ्यास करून हा प्रकल्प उभारला जाईल, असे चेअरमन मोहिते पाटील यांनी सांगितले.