सिंहगडरस्ता -“पुणे शहरातील उपनगरांत गणेश विसर्जन मिरवणुकीस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे,’ अशी माहिती शिवसेना युवा सेना शहर प्रमुख नीलेश गिरमे यांनी दिली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण नियमानुसार श्रोतागृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच वाद्य वापरण्याची परवानगी होती. त्यामध्ये 11 ऑक्टोबर 2002 मध्ये सुधारणा करण्यात आली. ध्वनिप्रदूषणाची पातळी निश्चित केलेल्या मर्यादेत ठेवत गणेश विसर्जन काळात रात्री दहाऐवजी बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वाजविण्यासाठी परवानगी देण्यात आली.
गिरमे म्हणाले, “पुणे शहरातील गणेशोत्सव हा नावाजलेला आहे. पण, या काळात बंधने असल्यामुळे गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. विसर्जन मिरवणुकीस रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी होती. त्यामुळे अनेक गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांनाच हिरमोड व्हायचा. या पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याची माहिती दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीस परवानगी दिली आहे.