पुणे: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) तर्फे आयोजित पीडीएफए साखळी – स्पर्धेच्या तृतीय श्रेणी गटाच्या सामन्यात सीएमएस फाल्कन्स, पूना सोशल आणि जुन्नर तालुका एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) ढोबरवाडी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सीएमएस फाल्कन्स संघाने पीसीएच लायन्स संघाचा 2-0 असा सहज पराभव केला. अक्षय अय्यर आणि आनंद तोमर हे दोघे संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी मारलेल्या गोलांच्या जोरावर आणि यासिन खान व ग्लेन विश्वास यांच्या अचूक पासवर संघाने विजयी सलामी दिली.
चुरशीने लढल्या गेलेल्या सामन्यात पुना सोशल संघाने एएफए सॅनफोर्ड संघाचा 2-1 असा पराभव केला. संजीव दास याने तुशार होले याच्या पासवर गोल करून पूना सोशल संघाचे खाते उघडले. त्यानंतर उत्तरार्धात नितेश मोगरे याने दिलेल्या पासच्या जोरावर सौरभ गायकवाड याने गोल मारून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. एएफए सॅनफोर्ड संघाकडून ऍरॉन आर्शिवादम याने गोल करून संघाची आघाडी 2- 1 अशी कमी केली.
अजय मोरे आणि उत्कर्ष घोरपडे यांनी केलेल्या गोलांच्या जोरवर जुन्नर तालुका संघाने फ्रेन्डस इलेव्हन संघाचा 2-0 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली. अजय मोरे याने 16 व्या मिनिटाला आणि उत्कर्ष घोरपडे याने उत्तरार्धात 28 व्या मिनिटाला गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला.