कोटेश्‍वर पुलाचे भिजत घोंगडे

* दोन वर्षे होऊन गेली तरी उरकेना काम
* गेंडामाळ नाका रस्त्यावर जीवघेणा प्रवास
* पालिका प्रशासन वठवतंय गांधारीची भूमिका
संतोष पवार
सातारा (प्रतिनिधी) – शहरातील नवीन रस्त्यांसाठी तसेच दुरुस्तीच्या कामांसाठी कोट्यवधींचा खर्च होवूनही या रस्त्यांवरील प्रवास म्हणजे अग्नीदिव्य पार केल्यासारखीच परिस्थिती आहे. विशेषत: कोटेश्‍वर मंदिर ते गेंडामाळनाका हा नगरपालिका हद्दीतील रस्ता वाहनधारक, पादचाऱ्यांसाठी जीवघेणाच ठरत आहे. या मार्गावर गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोटेश्‍वर पुलाच्या कामाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम असल्याने पालिका प्रशासनाला रस्त्याच्या कामासाठी एखाद्याचा बळी हवा आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.

सातारा शहराचा विचार केला असता राजपथ, पोलीस मुख्यालय रस्ता (खालचा रस्ता) आणि राधिका रस्ता हे तीन मुख्य मार्ग आहेत. या तीन मार्गांवर व अन्य अंतर्गत रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. दरवर्षी रस्त्यांच्या कामासाठी निधीची तरतूद करुनही पुन्हा दुरुस्तीसाठी होणारा खर्चही मोठा आहे. एवढा सगळा खर्च होवूनही शहरातील रस्त्यांची कायमचीच ओरड आहे. खराब रस्ते, पार्किंग समस्या, अतिक्रमणे यामुळे साताऱ्याच्या सौंदर्याला जणू धोकाच निर्माण झाला आहे. सातारा शहरापेक्षा ग्रामीण भागातील खेडेगावातील रस्त्यांचा दर्जा चांगला आहे, अशी टीका होण्याची वेळ पालिका प्रशासन पहात आहे की काय? असा सवाल सातारकर नागरिक करु लागले आहेत.

सातारा शहरासाठी माजी खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधीचा निधी मिळाला आहे. याशिवाय पालिकेच्या उत्पन्नातूनही रस्त्यांवर मोठा खर्च होत आहे. मग साताऱ्याच्या रस्त्यांची ही दयनीय अवस्था अवस्था का? रस्ते का टिकत नाहीत? याचा विचार होणे गरजेचे आहे. राजवाडा बसस्थानक ते गेंडामाळनाका हा सातारा नगरपालिकेच्या अख्त्यारितील रस्ता गेली कित्येक वर्षे मरणयातना सोसत आहे. दरवर्षी रस्त्याची दुरुस्ती होते. मात्र हा रस्ता वर्षातून काही महिनेच वाहतुकीसाठी सुरक्षित राहत आहे. रस्त्यावर असलेली अतिक्रमणे, महाकाय खड्डे यामुळे या रस्त्यांवर विशेषत: बोधे हॉस्पिटलसमोरील चढावर आत्तापर्यंत काहींना जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. त्यातच भर म्हणून गेल्या दोन वर्षांपासून लाखो रुपये खर्च होवूनही कोटेश्‍वर पुलाचे काम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे त्याचा फटका वाहनचालक, पादचाऱ्यांना बसल्याशिवाय राहत नाही. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांचा मात्र खुळखुळा होत आहे.

सातारा शहरालगत शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात विस्तार होत असताना कोटेश्‍वर मंदिर ते गेंडामाळनाका या रस्त्याची झालेली दुर्दशा ही चिंतेची बाब आहे. याबाबत शाहूपुरी व त्यापरिसरातील नागरिकांनी अनेकदा पालिकेकडे तक्रारी करुनही काम सुरु आहे, लवकरच काम होईल, अशा आश्‍वासनांचे गाजर दाखवण्याशिवाय काहीही झाले नसल्याचे दिसत आहे.

या रस्त्यावर प्राधिकरणाच्या पाईप फुटणे नित्याचेच बनले असून एखादाचा काय तो पुर्ण रस्ता उकरुन पाईपची कायमस्वरुपी दुरुस्ती करा, असे लोक आता उघडपणे बोलू लागले आहे. तसा विचार केला तर कोटेश्‍वर मंदिर ते गेंडामाळनाका हे अंतरही कमी आहे मग या रस्त्याची दुरुस्ती का होत नाही, असाही प्रश्‍न निर्माण होत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करुन अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी होत आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
शाहुपुरी परिसरातून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी या रस्त्याने रिक्षा, स्कूलबस, सायकलवरुन प्रवास करत असतात. तसेच अनेक पालकही आपल्या पाल्यांना दुचाकीवरुन अथवा पायी चालत याच रस्त्यावरुन घेवून जाताना दिसतात. मात्र कोटेश्‍वर पुलाचे रखडलेले काम, बोधे हॉस्पिटलसमोरील अरुंद व खराब रस्ता, अतिक्रमणे याचा फटका या विद्यार्थ्यांना बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना दुचाकी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेवून नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, अशी मागणी आता होत आहे.

डबराची नक्की काय भानगड?
कोटेश्‍वर मंदिर ते गेंडामाळनाका रस्ता दुरुस्तीचे काम सुरु होत आहे असे नेहमी पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मध्यंतरी तर या रस्त्यावर डबाराचे ढीग एका दिवसात पडले त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जणू गोड बातमीच वाटली. मात्र जे डबार टाकले होते त्याचा दर्जा पाहता रस्ता कुठल्या दर्जाचा होणार याचीच चर्चा झाली. त्यानंतर मात्र जसे एका दिवसात रस्त्यालगत डबर टाकले तसे एका दिवसात तेथून डबर हटवण्यात आले. त्यामुळे डबाराची नक्की काय भानगड? असे म्हणत ती गोड बातमी नव्हतीच अशी चर्चा परिसरात रंगली.

मणक्‍यांचा होतोय खुळखुळा
कोटेश्‍वर मंदिर ते गेंडामाळनाका प्रवास हा ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी खडतर बनला आहे. त्याचबरोबर अगदी तरुण असला तरी या मार्गावरुन गाडी चालवताना सगळ्यांचे मणके ढिले होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे मणके ढिले करायचे असतील तर कोटेश्‍वर मंदिर ते गेंडामाळ नाका रस्त्यावरुन प्रवास करा, अशी उपहासात्मक टीकाही आता होवू लागली आहे. त्यामुळे या रस्त्याचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावून सातारकरांचा प्रवास सुखकर कसा होईल, यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.