CM Eknath Shinde : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Death Anniversary) यांची आज पुण्यतिथी आहे. साताऱ्यातील कराडमध्ये असलेल्या त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी अनेक नेतेमंडळी पोहचले आहे. नेतेमंडळीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंचा कराड दौरा अचानक रद्द झाला असल्याचे समोर येत आहे.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Death Anniversary) यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे साताऱ्यातील कराडमध्ये त्यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी आज मोठी गर्दी होत असते. तर, आज सकाळपासून अनेक नेतेमंडळी कराडमध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज कराडमध्ये येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी येणार होते. त्यांचा शासकीय दौरा देखील निश्चित झाला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.