सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वांत उंच सुळका नववीच्या विद्यार्थ्यांकडून सर
पिंपरी (प्रतिनिधी) – एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरींग क्लब संस्थेच्या पाच गिर्यारोहकांनी रायगड जिल्ह्यातील लिंगाणा सुळक्यावर नुकतीच यशस्वी चढाई केली. त्यांनी “अल्पाईन’ या नवीन आधुनिक पद्धतीचा वापर करून ही चढाई एका दिवसात पूर्ण केली. या मोहिमेत चेलुवी ढोकले (वय 14 वर्षे), ओंकार बुर्डे (वय 15 वर्षे), गौरव लंघे, धनराज साळवी कृष्णा ढोकले यांनी सहभाग घेतला.
सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच सुळका असून समुद्रसपाटी पासून 3100 फूट उंच आहे. प्रस्तरारोहण उंची 920 फूट आहे. अल्पाईन या आधुनिक पद्धतीचा वापर करत दोन वेगवेगळ्या टीमने स्वतंत्र चढाई केली. अल्पाईन पद्धत म्हणजे कमीत-कमी वेळेत, कमीत-कमी साहित्य वापरून जास्तीत-जास्त चढाई करणे.प्रत्येकी एक रोप, हर्णेस, सेल्फ अँकर, हेल्मेट, 6 क्वीक ड्रॉ, 4 स्क्रू कॅराबीनर, 3 डिसेंडर, केवळ एव्हढेच साहित्य वापरण्यात आले. पहिल्या टीमचे नेतृत्व चेलुवी ढोकले हिने, तर दुसऱ्या टीमचे नेतृत्व गौरव लंघे याने केले
निगडीच्या अमृता विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी चेलुवी ढोकले हिने प्रथम चढाईस सुरवात केली. तिला सेफ्टी रोप (बिले) पुरविण्याचे काम कृष्णा ढोकले यांनी केले, तर दुसऱ्या टीम मध्ये गौरव लंघे याने सुरवात करून धनराज साळवी यांनी सुरक्षा दोर पुरविला, व ओंकार बुर्डे यांनी त्यांना इतर मदत केली. सकाळी नऊ वाजता सुरवात करून एका पाठोपाठ सलग चढाई करत दुपारी चार वाजता मोहीम पूर्ण करण्यात आली. पुणे सिंहगड पाबे घाट मार्गे संघ सिंगापूर मोहरी, या पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटच्या गावी गिर्यारोहक पोचले, तेथून पुढे ट्रेक करत बोरट्याची नाळ उतरून लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो, रायलिंग पठार व लिंगाणा यामधील खिंडीत निसर्ग देवतेची व सुळक्याची पूजा करून चढाईस सुरुवात केली.
गिर्यारोहकांनी दिलेल्या माहितीनुसार खिंडीमधील गर्द झाडीतून थंडी, वारा, आणि मच्छर याचा सामना करत चढाई केली. चढाई पूर्ण करून चेलुवी ढोकले प्रथम सुळक्याच्या माथ्यावर पोहचली आणि लिंगाणाच्या सुळक्यावरुन “जय भवानी-जय शिवाजी’ च्या घोषणा समोरच्या रायगडापर्यंत पोहचल्या. सुळक्याच्या माथ्यावरून रायगड, कोकणदिवा, कवळ्याकिल्ला, कोकण याचे विहंगम दृश्य व रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर स्पष्ट दिसते, त्यास नमस्कार करून, महाराजांचा आशीर्वाद घेऊन गिर्यारोहकांनी उतरण्यास सुरवात केली.