मॅटचे आदेश नसताना पूर्वपदावर हजर झाल्याचा समन्वय समितीचा आरोप
नगर – जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना हजर करून घेण्याबाबत प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद (मॅट) ने कुठल्याही प्रकारचे शासनास आदेश दिलेले नसताना मंत्रालय स्तरावर व प्रसारमाध्यमांना मात्र चुकीची माहिती नावंदे यांच्या मार्फत पुरविण्यात आल्याचे समन्वय समिती मार्फत मॅटच्या निकालाद्वारे कळविण्यात आले आहे.
नावंदे यांच्या विरोधात शासनाकडे केलेल्या तक्रारीची व लोकप्रतिनिधीच्या तक्रारीची दखल घेत नि:पक्ष चौकशी व्हावी व शालेय खेळाडूंच्या स्पर्धा बंद असल्याने नुकसान होऊ नये म्हणून नावंदे यांचा दि.21 ऑगस्ट रोजी शासन आदेशाने कार्यभार काढून घेऊन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्याकडे अतिरिक्त स्वरूपात देण्यात आला होता. मध्यंतरी नावंदे यांनी मॅटकडे धाव घेतली असता दि.27 ऑगस्ट रोजी मॅटकडून विजय संतान यांनी घेतलेल्या चार्जला स्थगिती मिळाली नव्हती. व इंटेरिम रिलिफ ही नाकारण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात नावंदे यांनी मंत्रालय स्तरावरुन प्रयत्न करत दि.18 ऑक्टोबरला नगर येथे हजर होण्याबाबतचे महाराष्ट्र शासनचे सहसचिव ह.मु. काझी यांच्या सहीने आदेश काढून घेतला.
ऐन आचारसंहितेच्या काळात अधिकाऱ्यांशी संगनमताने हे आदेश काढल्याने पुन्हा तो त्याच दिवशी स्थगित करण्यात आला होता अशी माहिती जिल्हा मुख्याध्यापक व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीचे वतीने प्रा. सुनील जाधव यांनी दिली.