पुणे – पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरणवणकर यांनी त्यांच्या “मॅडम कमिशनर’ पुस्तकात केलेल्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ उडाली आहे. या पुस्तकात बोरवणकरांनी “दादा’ असा उल्लेख करत धक्कादायक दावे केले आहेत. “दादांनी पोलिसांच्या जागेचा लिलाव केला. जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात मला सांगितले. मात्र, मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकावला,’ असे या पुस्तकात म्हटले आहे. मात्र, यामधील “दादा’ म्हणजे कोण? याबाबतचे स्पष्टीकरण बोरवणकर यांनी दिलेले नाही.
बोरवणकरांनी पुस्तकात म्हटले की, “पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एक दिवस मला तत्कालीन विभागीय आयुक्तांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितले, की “पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. हा विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील आहे. विभागीय कार्यालयातच मी तत्कालीन पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितले, की “या जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत मी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी.’
त्यावर मी सांगितले की, “येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही. शिवाय कार्यालये आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज आहे. मी आताच कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितले जाईल. पण, त्या मंत्र्याने माझे काहीही ऐकले नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला.’ दरम्यान, याबाबत मीरा बोरवणकरांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
कोणती आहे जागा?
बोरवणकर यांनी येरवडा पोलीस ठाण्याची जी जागा देण्यास नकार दिला, त्यावर येरवडा पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग कार्यालय आणि जप्त केलेली वाहने आहेत. उर्वरित भागात झाडेझुडपे वाढली आहेत. बोरवणकरांनंतर आलेल्या कोणत्याच पोलीस आयुक्तांनी या जागेला हात लावलेला नाही.