मुंबई – पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरणवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या “मॅडम कमिशनर’ (madam commissioner) पुस्तकात केलेल्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ उडाली आहे. या पुस्तकात बोरवणकरांनी “दादा’ असा उल्लेख करत धक्कादायक दावे केले आहेत. “दादांनी पोलिसांच्या जागेचा लिलाव केला. जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात मला सांगितले. मात्र, मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकावला,’ असे या पुस्तकात म्हटले आहे. मात्र, यामधील ;दादा’ म्हणजे कोण ? याबाबतचे स्पष्टीकरण बोरवणकर यांनी दिलेले नाही.या संपूर्ण प्रकारावरून अनेक प्रकारच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
हे संपूर्ण प्रकरण पुण्यातील येरवडा (Yerwada police Chauki Land) येथील पोलीस चौकीच्या जागेसंदर्भात आहे. या पुस्तकात स्पष्ट नावाचा उल्लेख नसून फक्त दादा असा उल्लेख केलेला असल्यामुळे अनेकांनी यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असल्याचा तर्क लावायला सुरुवात केली. यावरून राजकीय प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आहे. “पुस्तक लिहिणाऱ्या नावाजलेल्या अधिकारी आहेत. त्यामुळे सरकारनं आरोपांची शहनिशा करावी” असं रोहित अपवर म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
रोहित पवार (Rohit PAwar) पुढे म्हणाले,”कुणी कुठली जमीन घेतली, भ्रष्टाचार केला, कोण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यापेक्षा युवकांच्या समस्यांवर चर्चा करण्याची आवश्यकता आहे.माझी विविध स्वायत्त संस्थांकडून चौकशी सुरू आहे. माझ्यावर चौकश्या सुरू आहेत, तर सत्तेतील लोकांच्या चौकश्या सुरू करायला हरकत काय आहे ?” असा सवाल देखील रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला.
अजित पवारांनी देखील दिली प्रतीक्रिया
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जमीन विकण्याचा अधिकार नाही, त्यामुळे सरकारी जमीन विकता येत नाही. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मला कोणत्याही दबावाची पर्वा नाही, अशा प्रकरणांमध्ये मी नेहमीच सरकारी नियमांचे पालन करतो, तुम्ही प्राधिकरणाकडे याची चौकशी करू शकता, असे अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयाद्वारे काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.