Madam Commissioner book – पोलिस खात्याच्या मालकीची पुण्यातील जमीन विकण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यावर दबाव आणला होता असा आरोप माजी पोलिस अधिकारी मीरा बोवणकर (Meera Borwankar) यांनी एका पुस्तकात केला आहे, तो आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे.
‘पालक मंत्र्यांना जमीन विक्रीचा अधिकार नाही, त्यामुळे या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही’ असे अजित पवारांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, अशी प्रकरणे राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यापूर्वी महसूल विभागाकडे जातात आणि त्यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेते.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जमीन विकण्याचा अधिकार नाही, त्यामुळे सरकारी जमीन विकता येत नाही. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. मला कोणत्याही दबावाची पर्वा नाही, अशा प्रकरणांमध्ये मी नेहमीच सरकारी नियमांचे पालन करतो, तुम्ही प्राधिकरणाकडे याची चौकशी करू शकता, असे अजित पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त राहिलेल्या मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकात तत्कालीन पालक मंत्र्यांनी आपल्याला या जमिनीच्या व्यवहारासाठी आग्रह धरला होता असे म्हटले आहे. त्या 2010 ते 2012 या कालावधीत पुण्याच्या पोलिस आयुक्त होत्या.
नंतर त्यांनी पुण्यात अतिरिक्त महासंचालक (कारागृह) म्हणून पदभार स्वीकारला. पुस्तकात त्यांनी अजित पवारांचे थेट नाव घेतले नाही पण त्यावेळी तेच पुण्याचे पालक मंत्री होते. एएनआयशी दूरध्वनीवरून संवाद साधताना बोरवणकर म्हणाल्या, “अजित पवारांनी जमिनीचा लिलाव केला नाही कारण ते लिलाव करू शकत नाहीत. त्यांनी मला जमीन देण्यास सांगितले पण मी ते नाकारले.”