पुणे -यजमान सिटी एफ. सी. पुणे संघाने प्रितिश बाबर आणि लेऑन विक्रम यांच्या दोन गोलच्या जोरावर एएफए सॅमफोर्ड एफसी संघाचा 6-1 असा पराभव करून सिटी करंडक स्पर्धेत विजयी सलामी दिलीय.
लेऑन याने 25 व्या मिनिटाला सिटी एफ.सी. पुणे संघाचे खाते उघडले. त्यानंतर त्यांनी आपल्या खेळात सातत्य राखताना मध्यंतराला 1-0 ही आघाडी कायम राखली. पुणे संघाने 35 मिनिटात 5 गोल केले. सत्विक नायक याने 42 व्या, प्रितेशने 47 आणि 71 व्या मिनिटाला गोल केल्यावर लेऑनने 65 व्या मिनिटाला पेनल्टी किकवर संघाचा पाचवा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला.
त्यानंतर स्वप्निल महामुनी याने 55 व्या मिनिटाला गोल करून संघाचे विजयाधिक्य वाढेल याची काळजी घेतली. मात्र, शुभम पाटील याने 63 व्या मिनिटाला गोल करून सॅमफोर्डचे खाते उघडले. या गोलने त्यांना केवळ सिटी एफसीचे गोलाधिक्य कमी केल्याचे समाधान लाभले.
स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश शिवलकर, जीएमस इंडियाचे संचालत संजय पन्वर, नकलबेल स्पोर्टसचे संचालक आशिष पांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी राष्ट्रीय पंच गंगाराम चौधरी आणि सिटी एफसी पुणेचे अध्यक्ष शशांक कर्णिक उपस्थित होते.