भुवनेश्वर – टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांचे मंगळवारी येथे जोरदार स्वागत करण्यात आले. येथील विमानतळावर फुलांच्या माळा घालून तसेच औक्षण करून खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दोन्ही संघातील खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री टी. के. बहेरा आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार दिलीप तिर्की उपस्थित होते.
या सर्व खेळाडूंचा खास गौरव राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याहस्ते करण्यात आला. हा सोहळा येथील प्रसिद्ध कलिंगा स्टेडियमवर अत्यंत जल्लोषात आयोजित केला गेला.
ओडिशा सरकार 2018 सालापासून भारतीय हॉकी संघांचे अधिकृत प्रायोजक आहे. त्यातही सहारा ग्रुपची प्रायोजकता संपुष्टात आल्यावर याच सरकारने या संघांना प्रायोजकत्व बहाल केले. त्यामुळेच हे दोन्ही संघ टोकियोला रवाना होऊ शकले.
पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तब्बल 41 वर्षांनंतर पदक जिंकले. महिला संघानेही प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. हॉकी ओडिशामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. राज्यातील अनेक खेळाडू भारतीय संघाकडून खेळत आहेत. पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार बीरेंद्र लाक्रा व महिला संघाची दीप ग्रेस एक्का ओडिशाचेच आहेत.