पुणे – स्पोर्टसफील्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने आणि व्हिज्डम् क्रिकेट क्लब संघाने सलग तिसरा विजय मिळवून आपली घोडदौड कायम ठेवली.
मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या सामन्यात कर्णधार पुनित बालन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने वैंकिज् इलेव्हन संघाचा 31 धावांनी सहज पराभव करून आपले अपराजित्व कायम ठेवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने 18 षटकात 7 गडी गमावून 173 धावांचे आव्हान उभे केले.
यामध्ये धनराज शिंदे याने नाबाद 56 धावांची खेळी केली. दुसऱ्या सत्रामध्ये पुनित बालन यांनी 19 धावात 5 गडी बाद करून वैंकिज् इलेव्हन संघाच्या फलंदाजीची वाताहत केली. दुसऱ्या बाजूने सचिन भोसले याने 14 धावात 3 गडी बाद केले. यामुळे वैंकिज् संघाचा डाव 13.1 षटकात 80 धावांवर गडगडला.
दुसऱ्या सामन्यात अक्षय खोपडे याच्या 56 धावांच्या खेळीमुळे व्हिज्डम् क्रिकेट क्लबने फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा 109 धावांनी धुव्वा उडवून सलग तिसरा विजय नोंदविला. व्हिज्डम् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 197 धावांचे आव्हान उभे केले. अक्षय खोपडे (56 धावा), श्रीपाद निंबाळकर (नाबाद 49 धावा) आणि सागर वाघमारे (22 धावा) यांनी फलंदाजीचा भार उचलला. चौथ्या गड्यासाठी अक्षय आणि श्रीपाद यांनी 49 चेंडूत 98 धावांची भागीदारी केली व संघाला 190 धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाला उत्तर देताना फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा डाव 17.4 षटकात 88 धावांवर आटोपला.
संक्षिप्त धावफलक –
1) पुनित बालन ग्रुप – 18 षटकात 7 बाद 173 धावा. (धनराज शिंदे नाबाद 56, ऋषभ राठोड 36, सागर बिरवडे 2- 31) वि. वि. वैंकिज् इलेव्हन – 13.1 षटकात सर्वबाद 80 धावा. (आदित्य कदम 20, प्रणित राणे 18, पुनित बालन 5-19, सचिन भोसले 3-14). सामनावीर – पुनित बालन.
2) व्हिज्डम् क्रिकेट क्लब – 20 टकात 6 बाद 197 धावा. (अक्षय खोपडे 56, श्रीपाद निंबाळकर नाबाद 49, सागर वाघमारे 22, प्रफुल्ल मानकर 2-36) वि. वि. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब – 17.4 षटकात सर्वबाद 88 धावा. (सुदीप धरणगांवकर 17, आनंद जानोरकर 10, अमित खांडवे 3-22, प्रथमेश राठोड 2-9, सुभेंदू पांडे 2-8). सामनावीर – अक्षय खोपडे.