कंटेन्मेंट झोनमधून चिटपाखरूही बाहेर पडणार नाही
शहरात “एसआरपी’ पाचारण करणार
पुणे – प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध आता “मायक्रो लेव्हल’ला करण्यात येणार असून, चीनमधील वुहान शहराच्या धर्तीवर संपूर्ण “लॉकडाऊन’ करण्यात येणार आहे.
करोना आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या सहाय्याला चार सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांनी प्रतिबंधित भागांचा अभ्यास करून उपाय सूचवले. या समितीमध्ये साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि भूजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रात परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने तेथे अधिकच कडक निर्बंध लादणार आहेत. या भागातील बांबूचे बॅरिकेडिंग ओलांडून, तोडून अन्यत्र अनेकजण जात आहेत. त्यामुळेही आता प्रतिबंधीत क्षेत्रात थेट पत्रेच लावण्यात येणार आहेत.
या भागातील सुमारे 1 लाख नागरिकांना मिल्क पावडर, अन्नधान्यासह जीवनावश्यक कीट घरपोच देण्यात येणार आहे. याशिवाय 2 लाख मास्क वाटण्यास सुरुवात केली. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, तेथे पुरेसे पाणी, साबण, जंतुनाशके, सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. तपासणीचा वेगही वाढवण्यात येणार आहे. जेणेकरून बाधितांचा लगेचच शोध घेऊन, त्याचा आणखी फैलाव होऊ नये याची उपाययोजना करता येणार आहे.
पोलिसांना प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक बधत नाहीत. सर्रास वाहनांवर आणि चालत या भागात विहरत असतात. त्याला अटकाव करणे आधी महत्त्वाचे असून, पोलिसांना यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. यासाठी राज्य राखीव दलाची तुकडी मागवण्याचा विचार केला आहे. शुक्रवारचा एक दिवस वाट पाहून शनिवारी या संदर्भातील मागणी करणार आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच करोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकू शकू.
– शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त