मुंबई : जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कारण मागील 24 तासात 96,104 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 24 तासात 5584 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 70 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 39 लाख 13 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 13 लाख 40 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 28 लाख 65 हजार कोरोना रुग्ण आहेत.
जगात कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत झाला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना रुग्ण तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,292,623 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे . तर 76,928 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं 26,070 लोकांचा मृत्यू झाला आहे. 256,855 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,615 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 206,715 इतका आहे.
जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 75 हजारांच्या वर गेला आहे.