पिंपरी – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या मतदारसंघावर लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. भाजपकडून चिंचवड विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवल्याने विरोधी उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र विरोधकांनी उमेदवार उतरविल्यास या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाकडून एवढ्या तात्काळ पोटनिवडणूक जाहीर होईल, अशी शक्यता नसताना आज पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
चिंचवड विधानसभेवर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून भाजपचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. 2014 आणि 2019 साली झालेल्या विधानसभेत जगताप यांनी मोठे मताधिक्य मिळवत विजय प्राप्त केला होता. मात्र त्यांना गंभीर आजार झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून या मतदारसंघाची संपूर्ण धुरा त्यांचे लहान बंधू शंकर जगताप हेच सांभाळत होते. भाजपनेही त्यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी सोपविली होती. मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व अबाधित ठेवत शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही मतदारसंघाची बांधणी केल्यामुळे त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात
चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकदही मोठी आहे. गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने आपला उमेदवार न उतरविता अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. त्या निवडणुकीत कलाटे पराभूत झाले असले तरी त्यांनी चांगली लढत दिली होती. यावेळी राष्ट्रवादीमध्येही इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार की पुन्हा इतरांच्या मागे ताकद लावणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांचा विचार करता राष्ट्रवादी आपलाच उमेदवार उतरविण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची
शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने या मतदारसंघातील शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत. त्यातच बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतल्याने काही प्रमाणात का होईना या पक्षाची ताकद या मतदारसंघात आहे. बारणे आणि जगताप यांचे पुर्वीपासूनच राजकीय सख्य नाही. मात्र राज्यात आणि केंद्रात भाजपासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांची भूमिकाही निवडणुकीवर प्रभावर टाकणारी
ठरणार आहे.
2019 च्या निवडणुकीत जगतापांना 38 हजारांचे मताधिक्य
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कै. लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. जगताप, कलाटे यांच्यासह 11 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. जगताप यांना 1 लाख 50 हजार 723 तर अपक्ष कलाटे यांना 1 लाख 12 हजार 225 मते मिळाली होती. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत जगताप यांनी 38 हजार 498 मतांनी बाजी मारली होती. या विजयाने त्यांनी चिंचवड विधानसभेतील आमदारकीची हॅट्रिकही केली होती.
5 लाख 66 हजार 415 मतदार ठरविणार चिंचवडचा आमदार
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारांचा चिंचवड विधानसभा मतदारसंघ असून 5 लाख 66 हजार 415 मतदार आहे. हे मतदार पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार ओळख पत्राला आधारकार्ड लिंक, नाव, वय, पत्यात दुरुस्ती, मयत व नवीन नोंदणी अशा दुरुस्त्या झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने 5 जानेवारी रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहे. त्यात 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 732 महिला आणि 35 इतर मतदार आहेत. हेच मतदार आता चिंचवडचा नवीन आमदार ठरवणार आहेत.
27 फेब्रुवारी रोजी दोन्ही जागांसाठी होणार मतदान
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी असून 8 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार असून याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न
आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदार अथवा खासदारचे निधन झाल्यास ती जागा बिनविरोध निवडून देण्याची प्रथा महाराष्ट्रात पाळली जात होती. मात्र भाजपने पंढपूर, कोल्हापूर आणि देगलूरमधील जागेवर उमेदवार देऊन या प्रथेला छेद दिला होता. अपवाद फक्त मुंबईचा ठरला होता. आता भाजपच्या दोन आमदारांचे निधन झाल्यामुळे या जागा बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे हे दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.