नगर -विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या मागे संपूर्ण जिल्हा कॉंग्रेस असल्याचे दैनिक “प्रभात’ शी केलेले वक्तव्य जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना भोवले असून प्रदेश कॉंग्रेसकडून त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. अशा वेळी साळुंखे यांनी थेट पक्षाच्या श्रेष्ठींच्या निर्णयाला आव्हान देत तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. पक्ष काय भूमिका येत आहे. त्याचा विचार करता ते तांबे यांच्या मागे उभे राहिले आहे. नुकतीच त्यांनी दैनिक “प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई चुकीची असून आता संपूर्ण नगर जिल्हा कॉंग्रेस तांबे यांच्या पाठीशी राहील, अशी भूमिका व्यक्त केली. सत्यजीत तांबे यांच्या कामाचेही साळुंखे यांनी कौतुक करून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. यावरून प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त करून साळुंखे यांना थेट नोटिस बजावली आहे.
याबाबत दोन दिवसांच्या आत प्रदेश कार्यालयाकडे खुलासा लेखी स्वरुपात पाठवावा. असे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे. यानंतर आता साळुंखे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.