बीजिंग: ट्रम्प यांच्याच अकार्यक्षमतेमुळे संपूर्ण अमेरिकेत करोनाने थैमान घातले आहे. याचे सारे खापर दुसऱ्यावर फोडण्याच्या प्रयत्नांतून त्यांनी चीनवर भलते सलते आरोप चालवले आहेत, असा दावा चीनने केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या प्रभावातून बाहेर यावे अन्यथा आम्ही या संघटनेतून बाहेर पडू असा इशारा ट्रम्प यांनी दिल्यानंतर चीनने ट्रम्प यांच्यावर हा आरोप केला आहे.
चीनच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते झाआ लिज्जन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, अमेरिकेने स्वतावरची सारी जबाबदारी टाळण्यासाठी चीनचा खुबीने उपयोग करून घ्यायचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना ही चूक महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला पाठवलेले पत्र अत्यंत खोटारडेपणाचे आहे अशी टिपण्णीही लिज्जन यांनी केली.
लोकांची दिशाभूल करण्याचा अमेरिकाचा हा प्रयत्न आहे असे ते म्हणाले. अमेरिकेच्या नेतृत्वाने चीनवर आरोप करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय समुदायाला बरोबर घेऊन करोनाचा प्रसार थांबवण्यावर लक्ष केंद्रित करावे अशी सूचनाही त्यांनी केली. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबवला तरी चीन या संघटनेत आपले मोठे योगदान देईल अशी माहितीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.