====
नगर, दि. 2 (प्रतिनिधी) -नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेने कर्जाचा व्याजदर कमी करावा, यासाठी “सदिच्छा मंडळाने” रान उठवल्यानंतर जिल्ह्यातील बारा हजार सभासदांकडून कर्जाचा व्याजदर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे बॅंक संचालक मंडळ व गुरुमाऊली मंडळाने व्याजदर ठरवण्यासाठी अभ्यासगट नेमल्याची पोकळ घोषणा करुन “पोरकटपणा” सिद्ध केल्याची टीका सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी केली आहे.
मागील निवडणुकीत सत्तेत येताना गुरुमाऊली मंडळाने सभासदांना दिलेल्या वचननाम्यात वचन क्रमांक 6 हे महत्त्वाचे निर्णय आमसभेत घेऊ, असे म्हटले होते. कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी अभ्यासगट नेमला. मग घड्याळांची खरेदी करताना आमसभा वा अभ्यासगट का नाही? तसेच नेवासे शाखेच्या फक्त दुरुस्तीसाठी सुमारे 23 लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च दाखवली.
कर्मचाऱ्यांना रजा पगार देणे, सातवा वेतन आयोग देत आयोगाचा मागील सर्व फरक एकाच वेळेस देत त्यावर हात मारणे, संचालक प्रवास भत्यात वीसपट वाढ, सुरक्षारक्षकांच्या नावाखाली दरमहा हजारो रुपयांची लूट, कर्मचारी गणवेश खरेदी, कायम ठेव दरमहा हप्त्यात भरमसाठ वाढ करणे, या व इतर आर्थिक लाभाच्या अनेक गोष्टी करताना “अभ्यास गट का नेमला नाही? असा सवाल सदिच्छा मंडळाचे गजानन ढवळे, बाळासाहेब साळुंके, गोकुळ कळमकर, बाळासाहेब खिलारी, राजू कुदनर, अशोक आवारी, पांडुरंग काळे, बाळकृष्ण कंठाळी, रामदास दहिफळे, सुरेश खेडकर, रामदास गव्हाणे, हरिश्चंद्र बडे, गौतम साळवे आदींनी केला आहे.
तसेच जुलै 2020 मध्ये शेवटच्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत व्याजदर कमी करण्याचा ठराव पास होईल, ही भाबडी आशा सभासदांनी बाळगली होती. पण संचालक मंडळाने त्यास केराची टोपली दाखवली. निवडणूक दोन-तीन महिने राहिल्यावर थोडा व्याजदर कमी करुन सभासदांची चेष्टा करतील, अशी कोपरखळी सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पिंपळे यांनी मारली.
मुदत ठेव पावतीचा व्याजदर 7.25 टक्के केला. रिकरिंगचा व्याजदर 6.25 टक्के केला. याला अभ्यासगट लागला नाही. मग कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी अभ्यासगट म्हणजे निव्वळ पोरकटपणा असून, विद्यमान संचालक मंडळ बॅंक चालवण्यासाठी सक्षम नसून, त्यांना अभ्यासगटाच्या कुबड्यांची गरज पडते. त्यामुळे त्यांनी खुर्च्या खाली करुन निवडणुकीला सामोरे जावे, अशी टीका शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी केली आहे. अभ्यासगटाच्या नावाखाली वेळकाढूपणा करुन सभासदांचे कर्ज व्याजदरातून शोषण करणाऱ्यांना सभासद येत्या निवडणुकीत कायमचे हद्दपार करतील, असे नारायण राऊत, नवनाथ काळे, रमेश निकम यांनी सांगीतले.