पुणे – महापालिकेकडून शहरात करोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. मात्र, आता या सर्वेक्षणा सोबतच या नागरिकांना पालिकेकडून प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे मोफत वाटप करण्यात येणार आहेत.
या शिवाय, जे करोनाचे रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत, त्यांना पालिकेकडून औषधांचे किट तसेच जीवनसत्त्व असलेली औषधेही दिली जाणार आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 50 हजार किट तयार करण्यात येत असून लवकरच त्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
करोनाची बाधा होण्याची दाट शक्यता असलेल्या ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच इतर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, असे आजार असलेल्या नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे. अशा, नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधे देण्याची मागणी केली जात होती. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने “हायरिस्क’ गटातील रुग्णांना आता तपासणी सोबतच प्रतिकारशक्ती वाढविणारी जीवनसत्वांची औषधे तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयसीएमआरने मान्यता दिलेली औषधे किट स्वरूपात दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विलगीकरणातील रुग्णांनाही औषधे…
करोनाबाधित रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. त्यांना आता उपचाराची औषधे महापालिकाच उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठीही रुग्णांच्या लक्षणांनुसार, पालिकेकडून औषधांची किट तयार करण्यात येत असून रुणास विलगीकरणासाठी पालिकेच्या चाचणी केंद्रातून घरी पाठवितानाच ही औषधे दिली जाणार आहेत. सध्या, काही ठिकाणी औषधे दिली जातात तर काही ठिकाणी रुग्णाला चिठ्ठी देऊन औषधे आणण्यास सांगतात. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार सुरू व्हावेत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.