नवी दिल्ली – करोनाच्या साथीदरम्यान लहान मुलांमध्ये स्थुलपणा वाढीला लागण्याची शक्यता असल्याचे एक संशोधन पुढे आले आहे. करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांच्या शारीरिक हालचालींना मर्यादा आल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून जंक फूडचे सेवन करण्याचे प्रमाणही वाढले असल्याने लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराच आरोग्य तज्ञांनी दिला आहे.
लॉकडाऊन दरम्यान उच्च सामाजिक आर्थिक गटामध्ये लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. कोविड-19 च्या साथीदरम्यान जगभरात सर्वत्रच आरोग्य सेवा, अर्थकारण आणि अन्नवितरणाची व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. देशातील 22 राज्यांमध्ये करोनाच्या साथीच्या आगोदरच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये देशभरातील बालकांमधील पोषण आहाराचे विदारक चित्र स्पष्ट झाले होते. या पहाणीमध्ये काही राज्यांमध्ये कुपोषणाचे चित्र होते. तर 22 पैकी 20 राज्यांमध्ये करण्यात आलेल्या सरकारी सर्वेक्षणातही मुलांमध्ये स्थुलपणा वाढत असल्याचे दिसून आले आहे. मिशन पोषण या नव्याने सुरू केलेल्या सरकारी उपक्रमातही स्थुलपणावर लक्ष केंद्रीत केले गेले आहे. त्यातच करोनाच्या काळात वजन वाढणे आणि स्थुलपणाची समस्या अधिक बिकट होण्याचा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे.
लॉकडाऊनमुळे घरातच राहणाऱ्या मुलांच्या आहारात कार्बोदक आणि साखरेचे प्रमाण स्वाभाविकच अधिक असते. बिस्कीट, ब्रेड, बन, न्यूडल्स, आईसक्रीम, कूकीज आणि केक् तसेच तळलेले पदार्थ आदी पदार्थ मुलांच्या आहारात वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात स्थुलपणा वाढीला लागू शकतो. असे दिल्लीतील पब्लिक हेल्थ न्युट्रिशन ऍन्ड डेव्हलपमेंटच्या संचालिका डॉ. शीला वीर यांनी म्हटले आहे. पालकांकडूनही मुलांना असेच पदार्थ खायला दिले जात असतात, असेही त्या म्हणाल्या.
भारतातील मुलांना सध्या कुपोषणाच्या दुप्पट धोका आहे. मुलांना अतिपौष्टिकतेचा त्रास व्हायला लागला आहे. तसेच त्यांना पोषण कमी असणाऱ्या पदार्थांचे दुष्परिणामही त्रासदायक ठरत आहेत, असे “द कोऍलिशन फॉर फूड अँड न्यूट्रिशन सिक्युरिटी’चे कार्यकारी संचालक डॉ. सुजित रंजन म्हणाले.