लोणावळा : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर गुरुवारी सहकुटुंब कार्ला एकविरा देवीचे दर्शन घेतले. मात्र नेहमीप्रमाणे यावेळी देखील ठाकरे यांनी एकविरा गडावर राजकीय विषयावर भाष्य करायचं टाळून केवळ काही सत्कारांचा स्वीकार करून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.
वेहेरगाव येथील कार्ला गड निवासिनी एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबियांची कुलदैवत आहे. वर्षातून किमान दोन वेळा ठाकरे कुटुंबीय एकविरेच्या दर्शनाला येत असतात. शिवाय लोकसभा, विधानसभा तसेच मुंबई महानगरपालिका यासारख्या महत्वाच्या निवडणूक पार पडली की नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी घेऊन देवीच्या दर्शनाला येण्याची प्रथा देखील ठाकरे कुटुंबियांची आहे. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर आपल्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमवेत आई एकविरेचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, उपनेते अनंत तरे, गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे, शरद हुलावळे, बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री कार्ला देवीच्या दर्शनाला येणार यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्या उपस्थितीत लावण्यात आलेल्या या बंदोबस्तामुळे संपूर्ण एकविरा गडाला पोलीस छावणीचे रूप आले होते.
कार्ला फाटा येथे उड्डाणपुलाची मागणी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा याठिकाणी उड्डाणपुल बांधण्यात यावा अशी मागणी मवाळ तालुका शिवसेना आणि कार्ला ग्रामस्थांच्या वतीनं एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. कार्ला फाटा येथून कार्ला लेणी, भाजे लेणी तसेच लोहगड, विसापूर किल्ल्याकडे रस्ता जातो. त्यामुळे याठिकाणी सातत्याने अपघात होत असतात. हे टाळण्यासाठी या पुलाची नितांत आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.