ढाका : नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याच्या निषेधार्थ भारतात सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एके अब्दूल मोमेन यांनी आपला भारत दौरा अचानक रद्द केला. परराष्ट्र मंत्रालयातर्फे द्विपक्षीय चर्चेसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
बांगलादेशसहित तीन देशातील धार्मिक आल्पसंख्यांना भारताचे नागरिकत्व देण्याचा कायदा बुधवारी संसदेत संमत करण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर मोमेन यांनी दौरा रद्द करण्याच्या घटनेला महत्व प्राप्त झाले आहे. याबाबत अद्याप नवी तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे हा दौरा लांबणीवर टाकला की कायमचा रद्द केला. त्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.