भगवंत लोहार
मल्हारपेठ – पाटण तालुक्यातील नाडे ते ढेबेवाडी मार्गावरील दिवशी घाटात परिसरातील चिकन सेंटर चालकांकडून चिकनचे वेस्ट टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या घाणीमुळे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून परिसरात भटक्या श्वानांचा वावरही वाढला आहे. परिणामी भक्ष शोधणाऱ्या बिबट्यांसाठी भटके श्वान एक प्रकारची संधी ठरत आहे. यामुळे घाटामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून अनेक वेळा या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे प्रवास्यांमध्ये एक प्रकारची दहशतच जाणवत आहे.
पाटण हे तालुक्याचे ठिकाण असून या तालुक्याच्या ठिकाणाला ढेबेवाडी विभागाला जोडण्याचे काम दिवशी घाट करतो. या मार्गावर ढेबेवाडी, साबळेवाडी, मालदन, सुतारवाडी, शिद्रुकवाडी वाल्मीक पठारावरील असवलेवाडी, भिलारवाडी, काटकरवाडी, दिवशी बुद्रुक, डावरी, मरळी, गव्हाणवाडी, सांगवड या गावांचा समावेश होतो. नवारस्ता ते ढेबेवाडी हे अंतर सुमारे 21 किलोमीटर असून मरळी येथे सुरू होणारा आणि मालदन येथे संपणारा सुमारे 13 किलोमीटर अंतराचा दिवशी घाट या मार्गामध्ये येतो. दिवशी घाटामध्ये अरुंद रस्ते, वेडी-वाकडी वळणे, खोल दऱ्या, संरक्षक कठड्यांचा अभाव अशा अनेक समस्या असून या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना घाबरत प्रवास करावा लागतो.
दरम्यान, या अनेक समस्या असतानाच ढेबेवाडीसह परिसरातील, तसेच नवारस्ता परिसरातील अनेक चिकन सेंटरचे चालक चिकन सेंटरमधून निघणारे वेस्ट दिवशी घाटामध्ये आणून टाकत आहेत. परिणामी घाटातून प्रवास करताना प्रवास्यांना फार मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. चिकन सेंटरमधील हे वेस्ट श्वानांसाठी खाद्य ठरत असल्याने या परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. भटके श्वान बिबट्यासाठी आयते भक्ष्य ठरत असून घट परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या घाटातून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे घाटातून प्रवास करताना बिबट्याची दहशत प्रवास्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
त्यामुळे घाटामध्ये चिकन सेंटरमधील वेस्ट टाकण्यास मज्जाव करणे गरजेचे असून त्यासाठी व्यावसायिकांनी चिकन सेंटरमधील निघणाऱ्या घाणीची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती उपाययोजना आखली आहे, याची माहिती घेणे देखील महत्त्वाचे ठरत आहे. तसेच वेळप्रसंगी संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. एकूणच दिवशी घाटामध्ये चिकन सेंटरचे वेस्ट, भटक्या श्वानांचा वावर आणि बिबट्याला आमंत्रण अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून या सर्व समस्या दूर करून प्रवास्यांना प्रवास सुखकर करावा, यासाठी उपाययोजना राबवण्यात, अशी मागणी प्रवास्यांमधून होत आहे.
वाहनासमोरच बिबट्याची एंट्री
15 दिवसांपूर्वी डावरी घाटात प्रवास करत असताना एका गाडीच्या समोर अचानक बिबट्या आला. बराच वेळ बिबट्या जागचा हलला नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशाला घाम फुटण्याची वेळ आली. या बिबट्याचा व्हिडिओ परिसरातील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.