पुणे -विजेच्या कडकडाटासह शहरात गुरूवारी मुसळधार पावसाची नोंद झाली. शहरात बहुतांशी ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील कोथरूड, बावधन, पाषाण, पौड रोड, गोखले नगर, सेनापती बापट रोड इत्यादी ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. यात कोणीही जखमी झाले नसले तरी काही वाहनांचे नुकसान झाची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील कोथरूडसह इतर काही ठिकाणी सायंकाळी विद्यूत पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात आणि संपुर्ण मराठवाड्यात शनिवारी 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोथरूड, बावधनमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या जोरदार पावसाने क्षणात रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. तासभर पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. कोथरूड, बावधनसह वारजे आणि कर्वेनगर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गुरूवारी (दि. 13) बावधन परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर पाणी वाहू लागले. छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे रस्ते बंद झाले. तसेच कोथरूड डेपो, भुसारी कॉलनी, बावधन, आयडीयल कॉलनी, वारजे जकातनाका, कर्वेनगर, वारजे उड्डाणपूल याठिकाणी पाणी साचले होते.
झाडपडीमुळे रस्ते बंद, वाहतूक कोंडी
कोथरूड डेपो चौकात मोठे झाड पडल्यामुळे या मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या, त्यात पाषाण-बावधन रोड, वारजेकडे जाणारा सर्व्हिस रोड, महात्मा सोसायटी यासह चांदणी चौकातील मुख्य महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच रस्त्यांवर कोंडी झाल्याने चालकांची दमछाक झाली.
औंध, बाणेर परिसरात वादळी पाऊस
औंध : संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास औंध, बाणेर परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी पाऊस झाल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना पावसामध्ये भिजतच घरी जावे लागले. काही नागरिक आडोसा शोधत पाऊस कमी झाल्यानंतर घरची वाट धरली. मुसळधार पाऊस सुरू असतानाच औंध, बाणेर परिसरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.