संगमनेर – पुण्याहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत ट्रॅक्टरचे मधोमध दोन तुकडे होऊन त्याखाली दबल्याने चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थ्यासह दोन विद्यार्थीनीही जखमी झाल्या. अपघातानंतर पीकअप चालक वाहन सोडून पसार झाला. डोळासणे शिवारातील बांबलेवाडीजवळ गुरुवारी (ता.13) सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला.
संतोष नारायण शिंदे हा तरुण सकाळी आठच्या सुमारास आपला ट्रॅक्टर घेऊन घारगावकडून संगमनेरकडे येत होता. त्याचे वाहन डोळासणे शिवारातील बांबलेवाडीनजीक आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील पीकअप वाहनाने (एम.एच.15/एच.एच.8529) पाठीमागून ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, धडक झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्टरचे मधोमध दोन भाग होऊन त्याचा मोठा टायर ट्रॅक्टरपासून तुटून वेगळा झाला.
उर्वरीत इंजिनसह राहिलेल्या अर्ध्या भागात दबल्याने ट्रॅक्टरचालक संतोष शिंदे हा जागीच ठार झाला. हा अपघात घडला, त्यावेळी बांबलेवाडीतील अनुराग बाबाजी गोडे, अपेक्षा दत्तात्रय गोडे व राणी लहु लोहकरे हे तीन विद्यार्थी रस्त्याने पायी शाळेत चालले होते. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे काही अवशेष उडून इतरत्र पडल्याने त्यात हे तिघेही विद्यार्थी जखमी झाले. या अपघाताच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत गावकऱ्यांनी महामार्ग पोलिसांसह घारगाव पोलिसांनाही कळविले.
महामार्ग पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य करीत जखमी झालेल्या तिघा विद्यार्थ्यांना तत्काळ संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यातील अनुराग गोडे या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. ट्रॅक्टरचालक अपघातग्रस्त वाहनाखाली दाबला गेल्याने क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टरचे अवशेष उचलून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.